अमेरिकेला आंबा निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया व निर्यात सुरळीत

अमेरिकेला आंबा निर्यात पुन्हा सुरळीत; ११ मेपासून १८५.७५ टन आंब्याची निर्यात पूर्ण

marathinews24.com

पुणे – अमेरिका येथे आंबा निर्यातीसाठी आंब्यातील कोयकिड्याचा अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निर्यातीपूर्वी आंब्यावर विकिरण प्रक्रिया सुरळीत चालू असून ११ मे २०२५ पासून पुनश्च निर्यात सुरळीत झाल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

औषधी वनस्पती लागवड घटकाकरीता अर्ज करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

अमेरिकेला आंबा निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे. त्यानुसार पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून अमेरिकन निरीक्षकाच्या उपस्थितीमध्ये १ एप्रिल २०२५ पासून सदर प्रक्रिया करण्यात येत असून त्यांच्या तपासणीअंती आंब्याची निर्यात केली जाते. ८ व ९ मे २०२५ रोजी निर्यात झालेल्या काही कन्साईनमेंट मधील त्रुटीमुळे सदर आंबा कन्साईनमेंट अमेरिका येथे थांबवण्यात आल्या अशा आशयाच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या असून याबाबत कृषी पणन मंडळाकडून या बाबींच्या तपासणीचे कामकाज प्रगतीपथावर आहे.

८ व ९ मे २०२५ रोजी सुविधेवरील विकीरण प्रक्रियेची कॉम्पुटराईज्ड स्काडा सॉफ्टवेअरमधील माहितीची तपासणी केली असता किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेमध्ये आढळून आलेला असून आंब्याला विकीरण प्रक्रिया व्यवस्थितरित्या, परिणामकारक व नियमानुसार पुर्ण झालेली असल्याचे निदर्शनास आले आहे. तद्नंतर अमेरिकन निरीक्षकांनी तपासणी व खात्री करून, डोझीमीटरचे रीडिंग मधील किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेत योग्य असल्यामुळे निर्यातीकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र-२०३ स्वाक्षरीत करून दिलेले आहे व तद्नंतरच सदरहू आंबा अमेरिका येथे निर्यात झालेला आहे.

तथापि, त्यानंतर अमेरिकन निरीक्षक यांनी ८ व ९ मे २०२५ रोजी प्रक्रिया केलेल्या व अमेरिकेमध्ये पोहोचलेल्या १५ कन्साईनमेंटच्या डोजीमेट्री मध्ये काही त्रुटी आहेत असे कळविल्यामुळे १० निर्यातदारांच्या एकूण २५ मे. टन आंब्याच्या कन्साईनमेंट्स अमेरिकेमध्ये नाकारण्यात आल्या. मात्र येथे विशेषत्वाने असे नमूद करण्यात येते की, विकिरण प्रक्रिया संदर्भातील यु. एस. डी. ए., भारतीय एन.पी.पी.ओ. व अपेडा यांच्या दरम्यान स्वाक्षरीत झालेल्या ‘ऑपरेशनल वर्क प्लान’ मधील मुद्दा क्र. ११ मधील नमुद तरतुदीनुसार विकीरण प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढळल्यास, त्याबाबत सदरहू त्रूटी सुविधा केंद्राच्या निदर्शनास आणून देणेबाबत व त्रुटी दुरुस्त करण्याबाबत त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी तरतूद आहे.

मात्र, अमेरिकन निरीक्षकांनी असे न करता, इतर संबंधित यंत्रणांशी विचारविनीमय न करता थेट त्यांच्या अमेरिकेमधील वरीष्ठ कार्यालयास कथीत त्रुटींबाबत अवगत केले व त्यामुळे सदर १५ कन्साईनमेंट्स अमेरीकेमध्ये नाकारण्यात आल्या. सुविधेवरील अमेरीकन निरीक्षकांनी प्रमाणपत्र-२०३ देण्यापुर्वी सदर त्रुटी सुविधेवरील संबंधीत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्रुटींची पुर्तता करण्याकरिता संधी दिली असती तर आंब्याच्या निर्यातीमधील नुकसान टाळता आले असते.

अमेरिका येथे आंबा निर्यातीसाठीच्या प्रि-क्लिअरन्स प्रोग्रामचे संचालक श्रीमती इरीका ग्रोवर यांनी १० मे २०२५ रोजी दिलेल्या ई-मेलमध्ये सूचित केल्याप्रमाणे सुविधा केंद्र प्रमुख यांनी केलेल्या उपाययोजनाचा अहवाल यु.एस.डी.ए. च्या विहित नमुन्यांमध्ये ११ मे, २०२५ रोजी सादर करण्यात आला असून त्याआधारे त्याच दिवसापासून अमेरिकेला आंबा निर्यातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

वाशी येथील सुविधेवरुन ११ मे २०२५ पासून १८ मे २०२५ पर्यंत सुमारे ३९ कन्साईनमेंट द्वारे ५३ हजार ७२ बॉक्सेस (१८५.७५ मे. टन) आंबा अमेरीका येथे निर्यात करण्यात आला असून सदर आंबा अमेरिकन बाजारपेठेमध्ये विक्री केला जात आहे.. सदर आंब्यामध्ये राज्यातील हापूस, केशर, पायरी तर दक्षिण भारतामधील बैगनपल्ली, हिमायत व इतर वाणांची आंबा निर्यात सुरु आहे. उत्तर भारतामधील रसालु, लंगरा, चौसा, दशहरी आदी आंबा देखील विकीरण प्रकिया करुन निर्यात सुरळीत सुरु आहे.

सद्यस्थितीत वाशी येथील विकीरण सुविधेवरुन आतापर्यंत १ हजार ४१३ मे. टन आंब्याची अमेरिका येथे निर्यात झाली असुन सुमारे २ हजार मे. टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया येथे २७ मे. टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे, असेही पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top