खराडीतील घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन वारंवार फोनद्वारे पैशांची मागणी केल्याने २२ वर्षीय तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना खराडी येथे घडली. या प्रकारामुळे तरुणाला मानसिक त्रास झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी दोघांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिखर कुमारगौरव सक्सेना (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कुमारगौरव सुधीरकुमार सक्सेना (वय ४६, रा. गोपीचंद कॉलनी, ज्वालापूर, हरिद्वार, उत्तराखंड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार खराडी पोलिस ठाण्यात अजयकुमार भाटिया आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी आणि त्यापूर्वी आरोपींनी शिखर याला फोन करून ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी दिली. त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकारामुळे शिखरला मानसिक त्रास झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींच्या धमक्या आणि पैशांच्या मागणीमुळे त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शिखरने खराडीतील रिव्हरडेल सुइट्स सोसायटीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, तपास सुरू आहे.




















