सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयाच्यावतीने जयंती साजरी
marathinews24.com
पुणे – सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयाच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे.
यावेळी सहायक आयुक्त विशाल लोंढे, ज्ञानेश्वर जावळे, समाज कल्याण अधिकारी, माधुरी वाघमोडे, समाज कल्याण अधिकारी, प्रमुख अतिथी रवींद्र पठारे, समतादूत, विद्यार्थी उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर आज आयोजित कार्यक्रमात “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य” या विषयावर प्रा. डॉ. शैलेश द्रौपदा विश्वनाथ त्रिभुवन उपप्राचार्य, सिद्धिविनायक महाविद्यालय, कर्वेनगर, यांचे व्याख्यान झाले. तसेच श्रीमती उषा कांबळे समतादूत, बार्टी, पुणे यांनी “मी सावित्री बोलतेय” हा प्रभावी एकपात्री प्रयोग सादर केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र पठारे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त विशाल लोंढे होते. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, समतादूत, प्रकल्प अधिकारी तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रस्ताविकामध्ये समाज कल्याण अधिकारी श्रीमती माधुरी वाघमोडे यांनी सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
पठारे यांनी महामानवांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तर लोंढे यांनी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाज कल्याण अधिकारी ज्ञानेश्वर जावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेंद्र शेलार तालुका समन्वयक, पुणे यांनी केले.





















