कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन; आयटकच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
marathinews24.com
मुंबई – Maharashtra NHM Contract Employees : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2009-10 पासून कार्यरत असलेल्या गटप्रवर्तकांना शासनाच्या दि. 30 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना आयटक (AITUC) च्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या 16 ते 17 वर्षांपासून गटप्रवर्तक जिल्हा आरोग्य विभागात सातत्याने सेवा देत आहेत. कोविड महामारीच्या काळात तसेच शासनाच्या विविध आरोग्यविषयक मोहिमा आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत गटप्रवर्तकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मात्र, दि. 30 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार 10 वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी अभिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना गटप्रवर्तक पदाचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
दि. 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयात 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना समायोजनाचा लाभ देण्याचे तत्त्व मान्य करण्यात आले आहे. त्याच निकषानुसार 2009-10 पासून सेवा देणाऱ्या गटप्रवर्तकांचाही समायोजन प्रक्रियेत समावेश करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. (Maharashtra NHM Contract Employees) यावेळी दि. 30 जून 2026 च्या शासन निर्णयात गटप्रवर्तक पदाचा समावेश करून सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करावा आणि सन 2009-10 पासूनची सेवा 10 वर्षांच्या सेवागणनेसाठी ग्राह्य धरावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गटप्रवर्तकांच्या समायोजनाचा प्रश्न राज्याचे आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आणि यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. आयटकचे, शिष्टमंडळात स्वाती धायगुडे, राणी बगाडे, अश्विनी जगताप, लक्ष्मीप्रभा करे, सुप्रिया दळवी, स्वाती काळे, दीपाली मोहिते, शीतल गायकवाड, मंदा पवार आणि रूपाली राऊत यांचा समावेश होता.
गटप्रवर्तकांनी गेली 16-17 वर्षे आरोग्य विभागात सातत्याने सेवा दिली आहे. त्यामुळे त्यांची सेवा विचारात घेऊन शासनाने समायोजन प्रक्रियेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने करण्यात आली आहे.























