हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कोयते लपविण्यासाठी आईची साथ- आई सहआरोपी; चार कोयते जप्त – हडपसर पोलिसांनी सराइत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी विशेष माेहिम राहविली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार कोयते जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा एका अल्पवयीन आरोपीच्या घरात त्याच्या आईच्या परवानगीने कोयते लपवण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीनाच्या आईला सहआरोपी केले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात विविध ठिकाणी घडले गंभीर गुन्हे – सविस्तर बातमी
विश्वजित उर्फ यश रामचंद्र मोरे (वय २०, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मोरे याच्यासह त्याचा अल्पवयीन साथीदार आणि त्याच्या आईविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांकडून शुक्रवारी (८ ऑगस्ट) रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागातील सराइतांची गु्न्हेगारांची अचानक तपासणी करण्यात आली. हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने या कारवाईत विश्वजित आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. दोघांची चौकशी करण्यात आली. चौकशीत अल्पवयीनाने घरात कोयते ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांच्या घरातून चार कोयते जप्त केले. कोयते लपविण्यासाठी अल्पवयीनाच्या आईने परवानगी दिल्याची माहिती चौकशीत मिळाली.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गाेसाावी, अमित साखरे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजित राऊत , महेश चव्हाण आणि पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात अल्पवयीनाच्या आईला सहआरोपी केले आहे. यापूर्वी पोलिसांनी अल्पवयीन तरुणांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आता गुन्हेगारी कृत्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा देणाऱ्या पालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शहरात दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. किरकोळ वादातून वाहनांची तोडफोड केली जाते, तसेच कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना घडतात. दहशत माजविणारे सराइत कोयत्यांच्या धाक दाखवून नागरिकांना धमकावितात. कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कोयते, तसेच कृषी अवजारे विक्री विक्रेत्यांनी खातरजमा करुन कोयत्यांची विक्री करावी. सराइत, तसेच अल्पवयीनांना कोयत्याची विक्री करुन नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
खून प्रकरणात पोलिसांना दोन वर्ष गुंगारा; कर्नाटकातून तीन आरोपी अटकेत
पुणे – वानवडी भागात झालेल्या खून प्रकरणात पोलिसांना दोन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. कर्नाटकमधील विजापूर येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. सिकंदर आयुब शेख उर्फ सय्यद (वय ३४), जाकीर कादीर सय्यद (वय ४२) आणि अमिर अकील सय्यद (वय २३, तिघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आरोपींनी २०२३ मध्ये एकाचा खून केला होता. खून प्रकरणात आरोपी पसार झाले होते. ते ओळख लपवून राहत होते. खून प्रकरणातील फिर्यादीला आरोपींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जिवे मारण्याची धमकी दिली होती. पसार झालेले आरोपी कर्नाटकातील विजापूर भागात वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना कर्नाटकातून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्सनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, उपनिरीक्षक प्रमोद खरात, राजस शेख, प्रशांत कर्णवर , नासेर देशमुख आणि पथकाने ही कारवाई केली.
खूनाचा प्रयत्न प्रकरणातील आरोपी अटकेत
शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीनावर किरकोळ वादातून कोयत्याने वार करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. गुन्हा घडल्यानंतर आरोपी महिनाभर पसार होता. साजिद उर्फ बाबा नजीर लाला खान (वय २३, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेेल्याचे नाव आहे. आरोपी खान, साथीदार गौरव गणेश तेलंगी, अलोक सचिन अलगुडे यांनी गेल्या महिन्यात २ जुलै रोजी शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीनावर कोयत्याने वार केले होते. अल्पवयीनाने वार हातावर झेलला होता. अल्पवयीनाच्या पंजा तुटला होता.
या प्रकरणी आरोपी शिवाजीनगर पोलिसांनी तेलंगी आणि अलगुडे यांना अटक करण्यात आली होती. आरोपी खान हा पसार झाला होता. तो भवानी पेठेतील अंगारशाह तकिया परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी हेमंत पेरणे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक बर्गे, पोलीस कर्मचारी विनोद शिंदे, विठ्ठल साळुंखे, मयूर भाेसले, अमित जगदाळे, निलेश साबळे, उमेश मठपती यांनी ही कामगिरी केली.























