गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणाची ८ लाखांची आर्थिक फसवणूक
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याबाबत तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल केला आहे.
नको ते पाहण्यासाठी तरूणीला वॉशरूममध्ये गाठले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३३ वर्षीय तरुण आंबेगाव बुद्रुक परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर गेल्या वर्षी संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्याला एक ॲप उघडण्यास सांगितले. ॲपद्वारे तरुणाला गुंतवणूक योजनेची माहिती दिली. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ८ लाख १८ हजार रुपये जमा केले. सुरुवातीला चोरट्यांनी त्याला परतावा दिला. मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी परतावा दिला नाही. चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.