तब्बल अडीच कोटी रूपयांचा केला अपहार, ऑडीटमध्ये अपहार झाला उघड
Marathinews24.com
पुणे- पेट्रोल पंपावर मॅनेजर असलेल्या एकाने व्यवहार गोलमाल करीत पंप मालकाला तब्बल २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा गंडा घातला आहे. इंधन विक्रीतून नफाच होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पंप मालकाने ऑडीट केले. त्यानंतर व्यवहार आर्थिक घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नितीन रामचंद्र रायपुरे (वय ५२, मॅनेजर, रा.घोरपडेवस्ती लोणीकाळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय बाळकृष्ण काळे (वय ३६, रा.मगरपट्टा सिटी हडपसर) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अक्षय काळे यांचा कुंजीरवाडीत अॅटोकॉर्नर पेट्रोल पंप आहे. पंपावर मागील काही वर्षांपासून आरोपी नितीन रायपुरे मॅनेजर म्हणून काम पाहत होता. यापुर्वी हा पंप काळेंचे वडील पाहत होते. आरोपी रायपुरे १५ वर्षापासून त्यांच्या पंपावर मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्यामुळे रायपुरे याच्यावर काळे कुटूंबियांचा विश्वास होता. काही दिवसांपुर्वी तक्रारदार काळे यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्यामुळे पंपाचा कारभार त्यांनी स्वतःकडे घेतला. त्यावेळी पंपावरून इंधनाची विक्री तर होतेय, मात्र पैसे कोठे जातात हे समजत नव्हते. त्यामुळे त्यांनी व्यवहाराचे ऑडीट करून घेतले असता, त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.