लक्ष्मीपूजनाला खरेदी केलेल्या गाडीत दोघांचा जागीच मृत्यू
marathinews24.com
पुणे – Pune Car Accident News : ऐन दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नव्या कोऱ्या गाडीची खरेदी केल्यानंतर त्यातून केलेला प्रवास दोघांचा अखेरचा ठरला आहे. नवीन कारमधून फिरायला निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातला. सासवड-हडपसर सर्व्हिस रस्त्यावर अंधारात उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर कार चालक जखमी झाला. ही घटना १० नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
चाइल्ड ट्रॅफिकिंग केल्याची बतावणी; २२ लाखांना फसवले – सविस्तर बातमी
संजय वसंत मोडक (वय ४९) आणि अविनाश बाळासाहेब अर्णे (वय ३५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कार चालक सुनील दिगंबर मोडक (वय ३९) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील मोडक यांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नवीन मोटार गाडी खरेदी केली होती. त्यानंतर ते मित्रांसोबत कारमधून सासवड-हडपसर सर्व्हिस रस्त्याने हडपसरच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत संजय मोडक, अविनाश अर्णे होते. (Pune Car Accident News) सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीसाठी खुल्या असलेल्या ठिकाणी चालकाने धोकादायक पद्धतीने कंटेनर उभा केला होता. रात्रीच्या अंधारात कंटेनर उभा करताना त्याचे पार्किंग दिवेही सुरू ठेवले नव्हते.
त्यामुळे समोर उभा असलेला कंटेनर कार चालकाच्या लक्षात आला नाही. कारची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक बसली. अपघातात संजय मोडक आणि अविनाश अर्णे यांचा मृत्यू झाला, तर सुनील मोडक जखमी झाले. अपघातात नवीन कारचेही मोठे नुकसान झाले. दिवाळीच्या मुहूर्तावर घरात आलेल्या नव्या गाडीचा आनंद क्षणातच शोकात बदलला. दरम्यान, सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने आणि पार्किंग दिवे न लावता कंटेनर उभा केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.




















