ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून लाखोंचा गंडा
marathinews24.com
पुणे – Pune Cyber Crime News : फेसबुकवरील पेन्शन कार्डच्या जाहिरातीवर संपर्क साधल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार अलंकार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी जाहिरातीतील मोबाईल क्रमांकधारक, लाभार्थी बँक खातेधारक आणि खाते वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे महापालिकेला बॉम्बच्या धमकीचा ई-मेल; परिसरात खळबळ – सविस्तर बातमी
श्रीरंग वसंत रानडे (वय ६९, रा. लक्ष्मी नारायणनगर, पटवर्धनबाग रोड, एरंडवणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑक्टोबरला ऑनलाइन जाहिरातीला प्रतिसाद दिल्यानंतर फिर्यादींना फोन आला. आरोपींनी एपीके फाईल पाठवून पेन्शन कार्डची माहिती घेतली आणि त्यांच्या खात्यातून चार लाख ८५ हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.
मोबाईलचा वापर करून ज्येष्ठाची ४ लाख ८३ हजारांची फसवणूक
ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएम कार्डचा आणि मोबाईलचा गैरवापर करून त्यांच्या बँक खात्यातून चार लाख ८३ हजार १७२ रुपये काढल्याची तक्रार कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक, लाभार्थी बँक खातेधारक आणि खाते वापरणाऱ्या व्यक्तींवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद मेहबूब अब्दुल करीम मुजावर (वय ६७, रा. ग्रीनलँड अपार्टमेंट, दक्षिण सदर बाजार, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० सप्टेंबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादींच्या खात्यातील व्यवहार लक्षात आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड, मोबाईल किंवा सिमकार्डचा वापर करून रक्कम परस्पर काढल्याचा आरोप आहे.
बँक खाते ब्लॉक होण्याची भीती दाखवून पावणे तीन फसवणूक
कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे भासवून खाते ब्लॉक होण्याची भीती दाखवत एका महिलेची दोन लाख ७७ हजार ९२३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. खाते बंद होऊ नये म्हणून पैसे पाठवण्यास सांगून आरोपींनी रक्कम परस्पर वळविल्याची फिर्याद आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक आणि बँक खातेधारकांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Cyber Crime News याबाबत फरीदा हुसेन लोखंडवाला (वय ३९, रा. फ्लॅट क्र. ७०१, बी-३, मणिकचंद मालबार हिल को-ऑप. हाउसिंग सोसायटी, गेरा जंक्शनजवळ, लुल्लानगर, वानवडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान आरोपींनी फोन करून बँक खाते बंद होण्याची भीती दाखवली. खात्याची केवायसी पूर्ण नसल्याचे सांगून दोन लाख ७७ हजार ९२३ रुपये हस्तांतरित करून घेतले.
गुगल पे पिनचा गैरवापर; २४ लाख ६० हजारांची फसवणूक
झोपेत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन गुगल पेचा पिन मिळवल्यानंतर बँक खात्यातून २४ लाख ६० हजार ६५० रुपये वेगवेगळ्या व्यवहारांत वळविल्याची तक्रार काळेपडळ पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी तेजस नवनाथ निर्मळ (वय २४, रा. संग्राम डी, १७०२, सिंहगड रोड, नांदेड सिटी, वडगाव बुद्रुक, पुणे) याच्यावर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नेव्हील अविनाश रणभिसे (वय ४२, रा. धनश्री आशियाना, औताडे-हांडेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ ऑगस्ट ते १९ ऑक्टोबरदरम्यान आरोपीने रणभिसे यांच्या घरी जाऊन त्यांचा मोबाईल घेतला. गुगल पेवर पिन जोडून त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांतून रक्कम वळविल्याचा आरोप आहे.




















