बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून महापालिका परिसराची तपासणी; संशयास्पद वस्तू न आढळल्याने सुटकेचा श्वास
marathinews24.com
पुणे – Pune Municipal Corporation Bomb Threat : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर अनोळखी मेलवरून पालिकेत बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. यानंतर महापालिका परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने पाहणी केली. संशयास्पद आढळून आले नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. तर गेल्याच आठवड्यात राज्यातील विविध ठिकाणासह न्यायालयांमध्ये असाच मेल पाठवून बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली होती.
ऐन दिवाळीत काळाची झडप; नव्या गाडीतील प्रवास ठरला अखेरचा – सविस्तर बातमी
पुणे महापालिकेच्या ईमेल आयडीवर गुरुवारी (दि.१२) दुपारी पालिकेत बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल प्राप्त झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दल, पोलीस तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकांनी महापालिका परिसराची कसून तपासणी केली. बॉम्ब धमकीच्या ई-मेलमुळे महापालिका परिसरात काही काळ धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. मात्र, तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे संबंधित धमकीचा ई-मेल बनावट (फेक) असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या प्रकरणाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, धमकीचा ई-मेल कोठून आणि कोणी पाठविला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.




















