अड्डे शोधण्यासाठी होतोय ड्रोनचा वापर; परिमंडळ चारच्या हद्दीत ११ गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – छुप्या पद्धतीने हातभट्ट्यांची निर्मिती करून त्याद्वारे गावठी दारूविक्री करणार्यांविरूद्ध पुणे पोलिसांनी दंड थोपाटले आहेत. त्याअनुषंगाने आता थेट ड्रोनद्वारे वॉच ठेउन हातभट्टी तयार करणार्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिमंडळ चारच्या हद्दीत विविध पथकांंनी १३ आरोपींविरूद्ध ११ गुन्हे दाखल केले आहेत. त्यासोबतच १७८ लिटर हातभट्टी, ६०० लिटर दारु बनविण्याचे कच्चे रसायन असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवरात्रोत्सवात पादचारी महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी
दारू तयार करणार्या ठिकाणांवर वॉच ठेवण्यासह संबंधित अड्डे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. थेट ड्रोनद्वारे परिसराची टेहाळणी करीत हातभट्टीची ठिकाणी शोधून काढली जात आहेत. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांनी कितीही चलाखी करून भट्टी लपविण्याचा प्रयत्न उधळून लावण्यास पोलिसांना यश आले आहे. मागील काही दिवसांपासून खडकी, विश्रांतवाडी, चतुःशृंगी, येरवडा, विमानतळ, चंदननगर वाघोली पोलीस ठाण्याच्या अखत्यारित अवैध धंदेवाल्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीमेला गती देण्यात आली आहे.
कारवाईसाठी अधिकार्यांसह कर्मचार्यांचा फौजफाटा
हातभट्टीचे अड्डे समूळ नष्ट करण्यासाठी परिमंडळ चारच्या हद्दीत २४ सप्टेंबर पहाटेपासूनच कारवाईला सुरूवात करण्यात आली. त्यासाठी संबंधित ठाण्याच्या हद्दीत अधिकारी आणि कर्मचार्यांचा मोठा फौजफाटा कार्यरत होता. त्यामध्ये १८ पोलीस अधिकारी, ६० पोलीस अमलदारांद्वारे r मोहीम राबविण्यात आली. विशेषतः डोंगराळ भागात आणि नदी परिसरात लपून-छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणार्यांचा बाजार उठवण्यात आला. कारवाईत ११ गुन्हे दाखल करीत १३ जणांना ताब्यात घेतले. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
ड्रोनद्वारे अशी केली जातेय कारवाई
डोंगराळ भागासह निमर्नुष्य ठिकाणांसह अडगळीच्या जागी गावठी हातभट्टी तयार केली जाते. प्रामुख्याने कोणाच्याही नजरेत येणार नाही, अशारितीने अड्डे असतात. मात्र, त्यावर पुणे पोलिसांनी उतारा शोधला असून, थेट ड्रोन उडवून लाईव्ह चित्रीकरणातून अड्डे शोधले जात आहेत. त्यानंतर पोलिस अधिकार्यांसह कर्मचार्यांकडून त्याठिकाणी धाव घेउन अड्डे नष्ट केले जात आहेत. दरम्यान, तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे पोलिसांची मोठी पायपीट वाचण्यास मदत झाली आहे.



















