मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून वारकरी सेवा
marathinews24.com
पुणे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण तसेच वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि शिवस्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश खत्री यांच्या उत्कृष्ट नियोजन व संयोजनातून कोथरूड परिसरातील दिंड्या, भजनी मंडळे आणि वारकरी बांधवांसाठी आयोजित संतपूजन, वारी साहित्य वाटप व कीर्तन सेवेचा भव्य सोहळा रविवारी कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला वारकरी संप्रदायातील मान्यवर संत-महंत, हजारो वारकरी, वैष्णव भक्त आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, कार्यक्रमाचे नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि वारकरी बांधवांसाठी करण्यात आलेली सेवा याबद्दल उपस्थित संत-महंतांनी संयोजक गिरीश खत्री यांचे विशेष कौतुक केले.
गृहसंस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक–विद्याधर अनास्कर – सविस्तर बातमी
कार्यक्रमात श्री गुरु प्रा. बाळासाहेब ज्ञानेश्वर माऊली देहूकर, श्री गुरुप्रधान नामदेव वासकर, श्री गुरू हरिदास रामभाऊ बोराटे, श्री गुरू भगवान धोंडीबादादा शितोळेकर, ह.भ.प. रविकांत महाराज वकेकर, ह.भ.प. पवन महाराज पाटकर, ह.भ.प. अनिल महाराज जगनाडे, गुरुवर्य ह.भ.प. शंकरबाबा मराठे तसेच राष्ट्रसंत ह.भ.प. भाऊ महाराज परांडे यांच्यासह अनेक संत-महंतांचे पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी मा. ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी, कर्वेनगर परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी व नगरसेवक सहकुटुंब उपस्थित राहून संतांचे पूजन केले. यावेळी भगवताचार्य कीर्तनकेसरी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, साई एज्युकेशन ट्रस्टचे सागर शेंडगे, सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अनंत बापू सुतार, श्री विठ्ठल मित्र मंडळाचे अमित रोकडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सोपान वांजळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वारकरी बांधवांना वारीसाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या कीर्तन सेवेवेळी ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांनी संतपरंपरा, वारकरी संप्रदायाचे समाजप्रबोधनातील योगदान आणि अध्यात्माचे महत्त्व यावर प्रभावी निरूपण केले. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण मागणी करताना सांगितले, “सरकार विविध क्षेत्रातील लोककलावंतांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करते. वारकरी संप्रदायानेही समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि नैतिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. मात्र आजपर्यंत एकाही वारकऱ्याला पद्म पुरस्कार मिळालेला नाही. मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी यासाठी केंद्र सरकारकडे सकारात्मक पाठपुरावा करावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. संतांनी दिलेला समतेचा, सेवाभावाचा आणि भक्तीचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे. वारकऱ्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य असून, अशा उपक्रमांमधून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा उपक्रम केवळ साहित्य वाटपाचा नसून संतविचार समाजापर्यंत पोहोचविण्याचाही आहे. पुढील काळातही अशा सेवा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल.”
कार्यक्रमाचे संयोजक गिरीश खत्री यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “वारकरी संप्रदायाची सेवा करणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. संत-महंतांचे आशीर्वाद आणि वारकरी बांधवांचे प्रेम हीच आमच्या कार्याची खरी प्रेरणा आहे. भविष्यातही वारकरी संप्रदायासाठी अधिक व्यापक आणि सातत्यपूर्ण सेवा उपक्रम राबविण्याचा आमचा संकल्प आहे.” कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व वारकरी, संत-महंत आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर ‘ज्ञानोबा तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि भक्तिमय वातावरणात सोहळ्याची सांगता झाली.





















