भोर तालुक्यातील केंजळ गावातील घटना
marathinews24.com
भोर – बाजरी करताना मळणी यंत्रात स्कार्फ अडकल्याने २४ वर्षीय महिलेचे डोके शरीरापासून वेगळे झाले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भोर तालुक्यातील केंजळ गावात शनिवारी (दि. २६) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घटना घडली. सावित्रा पांडुरंग गायकवाड (वय २४, रा. केंजळ, ता. भोर, मूळ रा. आंतरावली, ता. गणसांगवी, जि. जालना) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पांडुरंग बाबूराव गायकवाड यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणाची ८ लाखांची आर्थिक फसवणूक – सविस्तर बातमी
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग गायकवाड यांनी गावातील नितीन बाठे यांचे मळणी यंत्र बोलावून शेतातील बाजरी भरडण्याचे काम सुरू होते. मळणी यंत्राद्वारे बाजरी भरडताना सावित्रा मशिनमध्ये पडलेली बाजरीची कणसे उचलत होती. यावेळी तिच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि केस हे ट्रॅक्टर व मळणी यंत्राला जोडणाऱ्या फिरत्या रॉडमध्ये अडकले. यामुळे तिचे डोके फिरत्या रॉडमध्ये ओढले गेले आणि अक्षरशः शरीरापासून वेगळे झाले. भयंकर घटनेत सावित्राचा जागीच मृत्यू झाला.
५ वर्षांपासून केंजळ गावात होती वास्तव्याला
सावित्रा गायकवाड गेल्या ५ वर्षांपासून आपल्या कुटुंबासह केंजळ येथील मयूर चव्हाण यांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करत होत्या. शनिवारी सायंकाळी सावित्रा आणि तिचे पती शेतीची कामे करत होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, राजगड पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.मळणी यंत्राच्या सुरक्षिततेच्या निकषांचाही तपास केला जाणार आहे.
गावावर परसली शोककळा
मळणी यंत्रात डोके अडकुन सावित्रा यांचा मृत्यू झाल्यामुळे केंजळ गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. सावित्रा ही कुटुंबाची आर्थिक आधारस्तंभ होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिकांनी मळणी यंत्रासारखी यंत्रसामग्री वापरताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.