सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी १५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.
पुण्यात अभाविपच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की; काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे लष्कर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एक कोटी १४ लाख रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर चोरट्याने त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना चोरट्याने परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
वाघोलीत ज्येष्ठ महिलेवर शस्त्राने वार करुन लुटले
गुरांना शेतात चरण्यासाठी घेऊन गेलेल्या ज्येष्ठ महिलेवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन दागिने लुटण्यात आल्याची घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत दीपक दत्तात्रय गोरे (वय ४६, रा. गोरे वस्ती, वाघोली, पुणे-अहिल्यानगर रस्ता) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे यांची आई गुरुवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास गोरे वस्तीतील शेतजमिनीत गुरांना चरण्यासाठी घेऊन गेली होती. त्यावेळी चोरटा तेथे आला. त्याने गोरे यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत, कर्णफुले हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. गोरे यांच्या आईने विरोध केला. चोरट्याने गोरे यांच्या आईचा चेहरा, हातावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कर्णफुले असा ९० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून चोरटा पसार झाला. चोरट्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपायुक्त अबिनाशकुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.


























