किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट
marathinews24.com
पुणे – Sinhagad Fort Development Plan : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्य व बलिदानाने पवित्र झालेल्या ऐतिहासिक भूमी किल्ले सिंहगडावर दीपावली पहाट कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाधी सुशोभीकरण, पूजन, लाठी-काठी प्रात्यक्षिके आणि शिवव्याख्यान अशा विविध उपक्रमांमुळे दीपावली पाडव्याचा हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय ठरला. दीपावली सणाचे औचित्य साधून गडावरील छत्रपती राजाराम महाराजांचे समाधीस्थळ, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक तसेच येथील अमृतेश्वर मंदिर परिसरात, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांच्या सहकार्याने विद्युत रोषणाई केली होती.
विद्युत रोषणाईमुळे सिंहगडाचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. गडप्रेमी आणि शिवभक्तांनीही या आकर्षक रोषणाईचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, सदस्य युवराज वांजळे, शुभांगी खिरीड, माजी सदस्य व गड-किल्लेप्रेमी दत्तात्रय जोरकर, सिंहगडाचे अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते, कार्यक्रमाचे आयोजक ॲड. मारुती आबा गोळे, राष्ट्रवादीचे सुधाकर गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेच्या, सिंहगडावरील शासकीय विश्रामगृह दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या कामाचा सविस्तर आढावा घेऊन तांत्रिक अडचणी दूर करत लवकरात लवकर ते काम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सभापती काकडे यांनी सांगितले.
ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी कार्यक्रम आयोजित केला जातो. (Sinhagad Fort Development Plan) या कार्यक्रमांसाठी जिल्हा परिषदेकडून अत्यल्प प्रमाणात अनुदान दिले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन किमान १ लाख रुपयांचे अनुदान मंजूर व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रयत्न सुरू असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे काकडे यांनी सांगितले. किल्ले सिंहगडचा वढू-तुळापूरच्या धर्तीवर, सुमारे २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा गेल्या अनेक वर्षांपासून तयार असून, तो शासनस्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या विकास आराखड्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी स्थानिक आमदार भीमराव तापकीर, जिल्हा परिषद सदस्य रुपाली रमेश कोंडे, पंचायत समिती सदस्य युवराज वांजळे आणि शुभांगी खिरीड यांच्या सहकार्याने राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीस्थळाजवळ स्वातंत्र्यकाळापासून आजतागायत कायमस्वरूपी विद्युत पुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याने, पुण्यतिथी कार्यक्रमाच्या वेळी तात्पुरत्या वीजव्यवस्थेसाठी मोठी कसरत करावी लागते. यंदा मला देखील येथील स्मारकाचे ठिकाणी विद्युत रोषणाई करत असताना त्याचा प्रत्यय आला आहे. रात्रीच्या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांनी ही बाब, सभापती युवराज काकडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर काकडे यांनी महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून छत्रपती राजाराम महाराजांचे समाधी स्थळाजवळ कायमस्वरूपी विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
किल्ले शिवनेरी तसेच किल्ले रायगडच्या धर्तीवर किल्ले सिंहगडावरही भव्य प्रवेशद्वार अथवा स्वागत कमान उभारण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी केली. यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे याकडे लक्ष वेधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती काकडे यांनी सांगितले. किल्ले सिंहगडावरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून येथील जुन्या कचरा कुंड्यांची दुरवस्था झाली असून, गडावर येणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता या कुंड्या अपुऱ्या पडत आहेत. गडावरील स्वच्छता अबाधित राहावी आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, (Sinhagad Fort Development Plan) यासाठी हवेली पंचायत समितीच्या माध्यमातून गडावर नवीन कचरा कुंड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सभापती काकडे यांनी दिले.
किल्ले सिंहगडावरील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती मिळावी, यासाठी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची लवकरच पुणे जिल्हा परिषद अथवा हवेली पंचायत समिती कार्यालयात विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व विषयांचा सविस्तर आढावा घेऊन प्राधान्यक्रमाने प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.




















