बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ घडला अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मोटार मेट्रोच्या खांबाला धडकनू तीन तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. २) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशजवळ घडला आहे. दरम्यान, अपघातात गंभीररित्या जखमी तरूणाला सीपीआर देउन त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे.
पुण्यात टोळीयुद्धातून खूनातील चौघे आरोपी ताब्यात – सविस्तर बातमी
यश प्रसाद भंडारी (वय २३ रा थेरगाव पिंपरी चिंचवड) आणि ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (वय २३ रा पिंपरीगाव) या दोन चुलत भावांसह खुशवंत टेकवाणी (वय २५ रा. मूळ- बीड) हा ठार झाला आहे. अपघातात ठार झालेले दोघेही तरूण चुलत भाउ असून, ते पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघाताचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. मात्र, चालकाने मद्यपान केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव मोटारीतील (एमएम १४ डीटी ८२९२) तिघे तरूण रविवारी (दि. २) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बंडगार्डन परिसरातून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने प्रवास करीत होते. त्यावेळेस वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट बंडगार्डन मेट्रो स्टेशन खालच्या खांबाला धडकली. त्यामुळे प्रचंड मोठा आवाज होउन गाडी १० ते १५ मीटर मागे फिरली. अपघाताच्या आवाजामुळे कामाला निघालेल्या नागरिकांनी मेट्रो स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. गाडीचा वेग कमालीचा असल्यामुळे वाहनाचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले. तर चालकासह शेजारी बसलेला चुलतभाउ जागीच ठार झाले होते. तसेच गाडीच्या पाठीमागील सीटवर बसलेला तरूण काच फुटल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत अडकला होता.
नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला अपघाताची माहिती दिली. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्याचे कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी अपघातातील तिघांनाही ससून रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच यश भंडारी आणि ओम भंडारी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर खुशवंत टेकवाणी याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
जखमी तरूणाला दिला सीपीआर
अपघातात गंभीर जखमी झालेल्या खुशवंत टेकवाणी याला तातडीने सीपीआर देण्यात आला. घटनास्थळी दाखल झालेल्या डॉक्टरांसह उपस्थितांनी खुशवंतला सीपीआर देउन जागे केले. ये मित्रा माझ्याकडे बघ, तुला काही झालेलं नाही, डोळे उघड, डोळे उघड असे म्हणत त्याच्या छातीवर दाब देउन श्वास सुरू केला. त्यानंतर लगेचच त्याला ससून रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



















