मुंढव्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी
marathinews24.com
पुणे – पार्थ पवार अमेडिया कंपनीने मुंढव्यातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, बोपोडीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शीतल तेजवाणी आणि अमेडिया कंपनीचा संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुंढव्यातील जमीन घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपींची चौकशी केली जाणार आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या स्फोटानंतर पुण्यातही सतर्कतेचा इशारा – सविस्तर बातमी
बोपोडीतील जमीन गैरव्यवहारासंदर्भातील गुन्हा खडक पोलीस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. तपासासाठी पोलिसांनी महसुली अधिकार्यांशी पत्रव्यवहार सुरु केला असून कागदपत्रांचे संकलन जारी केले आहे. मुंढव्यातील जमीन व्यवहारात आरोपी केलेल्या पार्थ पवार यांच्या अमोडीया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणात संबंध नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी ( दि. १०) स्पष्ट केले. त्याचबरोबर दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या तहसीलदार सूर्यकांत येवले याचे अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तपास केला जाणार आहे.
बोपोडीतील जमीन व्यवहाराची नोंदणी पुण्यातील गुरुवार पेठेतील हवेली तहसीलदार कचेरीत झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तहसीलदार येवलेने संगनमत करून हा व्यवहार केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याबाबत शासकीय चौकशीची प्रक्रिया पार पडल्यानंतर तहसीलदार येवलेला शासनाने निलंबित केले आहे. जमिनीचा अपहार करुन बेकायदा आदेश आणि पत्र तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येवले याच्यासह खडक पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
खडक पोलीस ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी
व्हिजन प्रॉपर्टीतर्फे कुलमुखत्यारधारक राजेंद्र रामचंद्र विध्वंस (रा. इंद्रा मेमरीज, सकाळनगर, बाणेर रस्ता), ऋषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विद्यानंद अविनाश पुराणिक (रा. इंदूर ,मध्य प्रदेश), जयश्री संजय एकबोटे (रा. चित्रलेखा बिल्डिंग, कुलाबा, मुंबई), हेमंत गवंडे (रा. सकाळनगर, बाणेर रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नायब तहसीलदार प्रविणा शशिकांत बोर्डे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त विवेक मासाळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. संबंधित जमिनीची सर्व जुनी कागदपत्रे, सातारबारा उतारे, त्यावरील बदलत गेलेल्या नोंदी आणि तत्सम अनेक कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केली आहेत पथकाने सोमवारी ( दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, मुद्रांक शुल्क कार्यालय आणि अन्य महसूल विभागातील अधिकार्यांच्या भेटी घेऊन आवश्यक कागदपत्रांच्या मागणीचे पत्र सादर केले. तहसीलदार येवले याच्याबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ महसूल अधिकार्यांना प्राप्त झाल्या आहेत. अधिकाराचा गैरवापर केल्याने फौजदारी गुन्ह्यासोबतच त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होईल, अशी शक्यता पोलीस अधिकार्यांनी व्यक्त केली.























