चोरट्यांकडून दुचाकी आणि मोबाइल जप्त
marathinews24.com
पुणे – लक्ष्मी रस्ता परिसरात एका खाद्यपदार्थ विक्रेत्याचा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.चोरट्यांकडून दुचाकी आणि मोबाइल जप्त करण्यात आला. रियाज मुझम्मील खान (वय १९), आयान जावेद शेख (वय १९, दोघे रा. अंगारशहा तकिया, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खान आणि शेख यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी जाळ्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीची सुटका – सविस्तर बातमी
तक्रारदार खाद्यपदार्थ विक्रेता मूळचा परराज्यातील आहे. तो लक्ष्मी रस्त्यावर कणीस विक्री करतो. गेल्या महिन्यात ३० जुलै रोजी रात्री बाराच्या सुमारास तो काम संपवून घरी निघाला होता. त्यावेळी तो मोबाइलवर आईशी बोलत होता. लक्ष्मी रस्त्यावर दुचाकीस्वार चोरटे खान, शेख आणि त्यांच्याबरोबर असलेला अल्पवयीन साथीदाराने त्याच्याकडील मोबाइल हिसकावून नेला होता.
घटनेनंतर खाद्यपदार्थ विक्रेत्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तपास पथकाने लक्ष्मी रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले, तसेच मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. मोबाइल हिसकावणारे चोरटे भवानी पेठेतील अंगारशहा तकिया परिसरातील असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी आशिष खरात, अनिस शेख, राहुल मोरे, शिवदत्त गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून खान, शेख आणि अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी लक्ष्मी रस्त्यावर एकाचा मोबाइल हिसकावून नेल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून एक मोबाइल संच आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
आरोपींनी मोबाइल हिसकावण्याचे आणखी किती गुन्हे केले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर, पांडुरंग वाघमारे, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अर्जुन थोरात, नितीन बाबर, सागर मोरे यांनी ही कामगिरी केली.
शहरात पादचाऱ्यांकडील मोबाइल , तसेच महिलांकडील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकासह शहरातील वेगवेगळ्या भागात पादचारी नागरिकांकडील मोबाइल हिसकावून नेले जातात. मोबाइल हिसकावून नेण्याच्या किमान दोन ते तीन घटना शहरात दररोज घडतात.
सराइतांकडून दोन पिस्तुले जप्त गुन्हे शाखेची कारवाई
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या सराइतांकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी लक्ष्मीपुत्र नागेश बडधाळ (वय २४, रा. हरीतारा सोसायटी, भीमनगर, कोंढवे धावडे), राहुल राजु थोरात (रा. दत्तवाडी, म्हसोबा चौक, पदमगल्ली) यांना अटक करण्यात आली. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी विविध कार्यक्रमांनित्त शहरात आले होते. त्यावेळी गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. आरोपी लक्ष्मीपुत्र याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमित बोडरे आणि महेंद्र तुपसौंदर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा दुसरे पिस्तूल साथीदार राहुल याच्याकडे ठेवण्यास दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले.आरोपींनी पिस्तूल का बाळगले ? तसेच त्यांनी पिस्तूल कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस हवालदार मोहम्मद शेख, तुषार किंद्रे, चेतन शिरोळकर, अमित बोडरे, महेंद्र तुपसौंदर आणि पथकाने ही कामगिरी केली.
ज्ञानेश्वर पादुका चौकात एकाला पकडले
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. अभिषेक राजू टेंकल (वय २३, रा. विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिवाजीनगर भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी अभिषेक हा ज्ञानेश्वर पादुका चौकात थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्यााच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. परिमंडळ एकचे पोलीस उपायु्कत ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, सचिन जाधव, दीपक रोमाडे, इसाक पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांनी ही कामगिरी केली.




















