विश्वाला हेवा वाटेल, अशी शिवजयंती साजरी करणार-अमित गायकवाड

विश्वाला हेवा वाटेल, अशी शिवजयंती साजरी करणार-अमित गायकवाड

ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराबद्दल सरदार घराण्यांकडून सत्कार

marathinews24.com

पुणे – जगातील कोणत्याही राजाची जयंती ज्या भव्यतेने आपण शिवजयंती पुण्यात साजरी करतो तशी होत नाही. स्वराज्यातील शंभराहून अधिक सरदार घराण्याच्या रथांच्या साक्षीने यंदाची शिवजयंती अवघ्या विश्वाला हेवा वाटेल, अशा स्वरूपाने साजरी करणार आहोत,” असा निर्धार शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी व्यक्त केला. शिवजयंती महोत्सवाला वैश्विक ओळख मिळवून दिल्याबद्दल अमित गायकवाड यांचा यथोचित सन्मान शासनाने करावा, अशी मागणी विविध सरदार घराण्यांच्या वतीने करण्यात आली.

विश्वकर्मा कारागिरांच्या वस्तूचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन – सविस्तर बातमी 

राज्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अमित गायकवाड यांना इजिप्त येथील सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून ‘ग्लोबल एक्सलन्स पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने विविध सरदार घराण्यांच्या वतीने गायकवाड यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. म्हात्रे पुलाजवळील स्वराज्यभूमी कृष्णसुंदर गार्डन येथे आयोजित कार्यक्रमावेळी शितोळे, शिळीमकर, घोरपडे, घारे, गरुड, पासलकर, पवार, राजेसाळुंखे, शिंदे, गायकवाड, भोईटे, मोहिते, ढमाले, बाबर, साबळे, जगताप, जाधव, सोनावणे, शिर्के, वाबळे यासह उपस्थित असंख्य घराण्यांच्यावतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते प्रशांत शितोळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या हस्ते कोल्हापूरच्या अंबाबाई मातेची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशांत शितोळे म्हणाले, “गेली १४ वर्षे अमित गायकवाड यांनी अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या. त्याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. १९ फेब्रुवारीला विश्वातील सर्वात मोठी ऐतिहासिक शिवजयंती शिवराज्याभिषेक दिनी ६ जूनला शिवस्वराज्य दिन, स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ॲालिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी महाराष्ट्र क्रीडा दिन या संकल्पनांनी देशाच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली आहे.”

सत्काराला उत्तर देताना अमित गायकवाड म्हणाले, “गेली १४ वर्षे विविध संस्थांच्या माध्यमातून स्वराज्य कार्य सुरू असून, १९ फेब्रुवारी २०१३ रोजी शिवजयंती साजरी करण्याची अभिनव संकल्पना मांडली. स्वराज्यातील विविध घराण्यांनी प्रतिसाद दिल्याने आज शंभर स्वराज्य रथांच्या सहभागासह हा सोहळा जगातील सर्वात मोठा ऐतिहासिक शिवजयंती उत्सव बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत लढलेल्या वीर सरदारांच्या वंशजांना एकत्र आणून त्यांच्या नावाने स्वराज्यरथ काढण्याची परंपरा सुरू केली. पहिल्या वर्षी सहा रथ होते; आता दीडशे अर्जांमधून किमान १०० रथ सहभागी होणार आहेत. हा सोहळा लाल महाल परिसरातून सुरू होतो आणि जगभरातील शिवभक्तांचे लक्ष वेधतो.”

शिवराज्याभिषेक दिन ६ जून हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून संपुर्ण भारतभर साजरा व्हावा, ही संकल्पना मांडत २०१३ पासून विविध माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे मागणी करत पाठपुरावा करण्यात आला. २०२१ साली शासनाने परिपत्रक काढत हजारो गावांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. तसेच पंचस्वराज्य चिन्हांनी सजलेला भगवा ध्वज शासनाने मान्य केला. स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जन्मदिन १५ जानेवारी ‘महाराष्ट्र क्रीडा दिन’ जाहीर करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या २०१७ च्या सर्वसाधारण सभेमध्ये पारित करुन महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने २०२३ साली तो मान्य केल्याने राज्यभर क्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्व उपक्रमांच्या यशाचे श्रेय स्वराज्य घराणी, स्वयंसेवक, माता-भगिनी, सहकाऱ्यांना आणि कुटुंबीयांना देत गायकवाड म्हणाले, “हे यश माझे नसून शिवभक्तांचे आहे. या कार्याचा मान मी शिवछत्रपतींच्या चरणी अर्पण करतो. छत्रपती आणि स्वराज्याची सेवा यापुढेही घडत राहील, असा विश्वास व्यक्त करतो.” माजी क्रीडा संचालक विजय संतान, शिवाजी साळुंखे, राजेंद्र घुले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×