पुण्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेला जीव गमवावा लागला; अजित पवारांकडून चौकशीचे आदेश
Marathinews24.com
पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या महिलेला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली आहे.
पैशाची अडवणूक केल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी
आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून कारवाई करेल. घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.