पुणेकरांनो पाणी जपून वापरा ३ एप्रिलला पाणीपुरवठा बंद, ४ एप्रिलला कमी दाबाने पुरवठा
marathinews24
मराठी न्यूज२४ पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी, ३ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, ४ एप्रिल २०२५ रोजी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीचे नियोजित काम ३ एप्रिलला हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पुणे शहरातील सर्व भागांना पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. हे काम पूर्ण झाल्यानंतर ४ एप्रिल रोजी पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल, मात्र तो कमी दाबाने आणि वेळेच्या विलंबाने होणार आहे असेही सांगितले. पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांनी गरजेपुरते पाणी साठवून ठेवावे आणि अत्यावश्यक कारणांशिवाय पाण्याचा वापर टाळावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
महानगरपालिकेने या कामासाठी आवश्यक उपाययोजना केल्या असून, दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तरीही नागरिकांनी याबाबत जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पाणीकपातीचा परिणाम पुणे शहरातील बहुतांश भागांवर होणार असून, नागरिकांनी ३ आणि ४ एप्रिल या दोन दिवसांसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.