पाषाणमधील रिलायन्स मार्टजवळील घटना
marathinews24.com
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी जेष्ठ महिलेकडील १ लाख ७० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २१एप्रिलला सकाळी साडेआठच्या सुमारास पाषाणमधील रिलायन्स मार्टजवळ घडली आहे. याप्रकरणी ७५ वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघा अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात आहे.
पुण्यात जेष्ठाला ७० कोटींचा घोटाळ्याच्या बतावणीने गंडवले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला पाषाण परिसरात राहायला असून, २१ एप्रिलला सकाळी साडेआठच्या सुमारास मोरया रेसीडन्सीजवळून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना थांबवले. आम्ही पोलीस असून, पुढे काही महिलांकडील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत, असे सांगितले. तुमच्याकडील सोन्याचे दागिने कागदात सांभाळून ठेवा असे म्हणत चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केला. त्यानंतर चोरट्यांनी कागदात खोट्या अंगठ्या बांधून देत, हातचलाखीने महिलेकडील १ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करीत आहेत.
महिलांनो सावधान, बतावणीला बळी पडू नका
एटीएम सेंटरमध्ये मदतीचा बहाणा करून हातचलाखी करणे, पोलीस असल्याची बतावणी करीत दागिने कागदात ठेवायला सांगणे, शेठजीला मुलगा झाला असून, मोफत साडी वाटपाचे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केले आहे. विशेषतः निमर्नुष्य ठिकाणांवर चोरट्यांकडून जेष्ठ महिलांना अडवून बतावणी करीत विश्वास संपादित केला जातो. त्यानंतर हातचलाखीने दागिने लंपास केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनो घरातील जेष्ठ महिलांना बाहेर पाठवण्याआधी काळजी घेणे गजरेचे आहे.





















