माझा संघर्ष अहिंसावादी – डॉ. श्रीपाल सबनीस

माझा संघर्ष अहिंसावादी - डॉ. श्रीपाल सबनीस

रोटरी साहित्य संमेलनात गाजली डॉ. सबनीस यांची मुलाखत

marathinews24.com

पुणे – माणसांचे सामर्थ्य आणि मर्यादा तसेच संवाद आणि संघर्ष, यांच्या आधारावर माझी विवेकवादी तिसरी भूमिका आधारली आहे. कुठलेही मूल्यमापन, सत्यांश मी या भूमिकेवरच स्वीकारतो अथवा नाकारतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

रोटरी मराठी साहित्य संमेलनात डॉ. सबनीस यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह आणि संस्कृती प्रकाशनाच्या प्रमुख सुनीताराजे पवार यांनी संवाद साधला. या मनमोकळ्या संवादातून डॉ. सबनीस यांचे ब्राह्मणी कुटुंब, ब्राह्मण घरातले धार्मिक – नैतिक संस्कार, रझाकारांशी त्यांच्या वडिलांनी केलेला संघर्ष असे अनेक अपरिचित पैलू उलगडत गेले.

डॉ. सबनीस म्हणाले, मी जमीनदार ब्राह्मण कुटुंबात जन्मलो, वाढलो. दया, करुणा, क्षमा, सहवेदना, गरिबांविषयी कळकळ घरातील संस्कारांतूनच निर्माण झाली. पण अभ्यास सुरू झाल्यावर मला विवेकवादी भूमिकेचे महत्त्व लक्षात आले. त्यातूनच माझे पीएचडीचे संशोधन डॉ. आंबेडकरांच्या ‘बहिष्कृत भारता’च्या संदर्भात पूर्ण करावेसे वाटले. तिथेही मी माझी वैचारिक भूमिका ठाम ठेवून आंबेडकरवादाची नव्याने मांडणी केली.

दुःख हाच मुळी साहित्याचा ध्येयवाद आहे, त्यातून संवादी बाजूचे महत्त्व लक्षात आले. मी सदैव संवादी राहिलो आहे. नाईलाजाने जिथे संवाद संपतो, पण अन्याय थांबत नाही, तिथे मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. पण माझा संघर्ष अहिंसावादी आहे. विद्रोहदेखिल अहिंसावादी असला पाहिजे, तरच तो अर्थपूर्ण ठरतो, असे मला वाटते. त्यातून विवेकी विद्रोहाचे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मी नव आंबेडकरवादाची मांडणी केली आहे, असे ते म्हणाले.

सुरवातीपासूनच आमच्या घरी शेतकरी, आदिवासी, दलित, भटके, विमुक्त, विद्यार्थी यांचा सतत वावर होता. त्यांच्या चळवळींशी मी नेहमीच संबंधित राहिलो. त्यांच्यासोबतच मी महापुरुषांच्या चरित्रांचा, लेखनाचा अभ्यास केला. डॉ. आंबेडकर स्वतः जातीवादी नव्हते, पण आंबेडकरवादी चळवळ जातीवादी बनली. त्यात कर्मठपणा आला, वाढला. तो मला निषेधार्थ वाटला. समाजात विविध ‘इझम्स’ वेगवेगळ्या काळात उदयाला येतात, वाढतात. त्या त्या काळाची ती निर्मिती असते. त्यासाठीच धुरिणांनी विवेकाच्या अधिष्ठानावरील नवा विचार, नव्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी मांडायचा असतो. मात्र, यासाठी महापुरुष हेही माणूसच होते, याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे असते आणि मर्यादा माणसालाच असतात, याचेही भान हवे. त्यामुळेच मी वैचारिक लेखनासाठी सामर्थ्याप्रमाणेच त्यांच्या मर्यादांचाही विचार केंद्रस्थानी ठेवला. कुठल्याही विशिष्ट ‘वादी’ भूमिकेतून महापुरुषांकडे न पाहता, मानवतेच्या भूमिकेतून मी मांडणी केली, असे सांगत सबनीस यांनी आपल्या वैचारिक, समीक्षात्मक लेखनाचा प्रवास सांगितला.

ज्येष्ठ लेखक, समीक्षक प्रा. नरहर कुरुंदकर हे माझे गुरू. प्रखर तर्कनिष्ठता आणि बुद्धीवादी विचार, वस्तुनिष्ठ भूमिका, मूल्यमापनाचे भान, त्यांचीच देणगी आहे. मी सुरवातीला वगनाट्य, लोकनाट्य, पोवाडे, नाटके, एकांकिका लिहिल्या. शाहिरी केली. नंतर मी समीक्षात्मक तसेच वैचारिक लेखनाकडे वळलो, असे सांगून ते म्हणाले, लेखनामागील भूमिकेच्या ठामपणामुळे मला अनेक विरोधक निर्माण झाले. बाबासाहेब पुरंदरे, पाटील, डॉ. सदानंद मोरे, विश्वास पाटील, श्रीमंत कोकाटे, आ. ह. साळुंके अशी अनेक नावे सांगता येतील. त्यांच्यासोबतचे माझे वैचारिक वाद गाजले. मात्र, मी विवेकवादी भूमिकेवर अटल राहिलो आहे. सर्व समाजघटकांवर मी सारखेच प्रेम करतो आणि तेही मला आपला समजतात. या सर्वसमावेशक भूमिकेतूनच मी जगत आलो आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×