लोकसेवा हक्क म्हणजे केवळ कायदा नव्हे, तर ती एक भावना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
marathinews24.com
मुंबई – लोकशाहीत लोकांसाठी कर्तव्य भावनेने काम करायचे असते. लोकसेवा हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना आहे असे आपण म्हणतो या वाक्याला लोकसेवा हक्क आयोगाने खरा अर्थ मिळवून दिला आहे. हा कायदा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची गंगोत्री आहे. वर्धा, यवतमाळ आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले त्यांचा सत्कार करण्यात आला. अशाच प्रकारे इतर जिल्ह्यातही काम केले जावे. हा कायदा प्रशासन व नागरिकांमधला विश्वासाचा एक पूल आहे, म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणाचा हा पाया अधिक मजबूत होऊन या अधिनियमाच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ सेवा मिळाव्यात असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला ऑनलाईन सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मायक्रोसॉफ्ट सोबत देखील यासाठी करार केला आहे. महाराष्ट्र डिजिटल गव्हर्नन्समध्ये देशासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले. यावेळी वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सेवादूत प्रकल्पाची सुरुवात केल्याबद्दल, यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अभिप्राय कक्ष सुरू केल्याबद्दल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पद्मश्री शंकर महादेवन, सोनाली कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला.
राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीच्या गेल्या दहा वर्षातील वाटचालीबाबत माहिती दिली. तसेच या कायद्याच्या जनजागृतीसाठी आयोग व शासन अनेक सुनियोजित नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणार असून भविष्यात आयोगाने हाती घेतलेल्या व शिफारस केलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुणेचे राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी आभार मानले.