पुणे पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतरही बेदरकार ‘यमदूत’ सुसाट
marathinews24.com
पुणे – मोठ्या बहिणीसोबत दुचाकीवर बसून अभ्यासिकेला जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाचा ट्रकला (हायवाला) धडकून मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बेशिस्त ट्रक चालकांसह ट्रॅव्हलविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. माञ, तीनच दिवसांत बेदरकार हायवा ट्रक चालकाने मुलाचा बळी घेतल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतरही बेदरकार ‘यमदूत’ सुसाट असल्याचे दिसून आले आहे. ट्रक चालकाविरोधात खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ट्रेंडीग स्टॉकचे आमिष पडले १५ लाखांना; सायबर चोरट्यांकडून तरूणाला गंडा – सविस्तर बातमी
अंशुमन गायकवाड (वय ११) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. ट्रक चालक राजाराम दयाराम राठोड (वय ४८, रा. वडगाव शेरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तन्मयी अनुपकुमार गायकवाड (वय २३, रा. केशवनगर) हिने फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तन्मयी ही लहान भाऊ अंशुमनला शनिवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास खराडीतील झेन्सार ग्राऊंड समोरील रोडवरुन क्लासला घेऊन जात होती. त्यावेळी ट्रक चालक (हायवा ) त्यांच्या दुचाकीसमोरून जात होता. संबंधित चालकाने निष्काळजीपणा आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत स्पीडब्रेकर आल्याने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे ट्रकच्या पाठीमागे असलेल्या तन्मयीचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने हायवाला पाठीमागून धडकली. यात तन्मयी डाव्या बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाली. मात्र, अंशुमन हायवाच्या मागील चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक तांगडे करत आहेत.
बेदरकार वाहनांवरील ‘यमदूत’ फिरतायेत
वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्कीलचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना शहरात मोठे ट्रक हायवा, टिप्पर फिरू देऊ नका, त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश दिले होते. बहुतांश टिप्पर, हायवा हे शहरातील राजकीय मंडळींच्या मालकीचे असल्याने त्यांच्या दबावाला बळी देखील पडू नका असेही सांगितले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी हायवा चालकाच्या निष्काळजणीपणामुळे हा अपघात झाल्याने हे ‘यमदूत’ पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतरही सुसाट असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीही सिमेंट मिक्सर, हायवा, टिप्पर यांच्या चुकांमुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बेदरकार यमदूतांचा वावर पूर्ण बंद केला तरच, भविष्यात अनेकांचे प्राण वाचतील असे बोलले जात आहे.