३८ ब्लॅकस्पॉट मृत्यूचा सापळा
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात बेदरकारपणे वाहन चालविणार्यांमुळे पादचार्यांसह इतर वाहन चालकांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. मागील आठ महिन्यांत पुण्यातील विविध भागात रस्ते अपघात तब्बल १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. प्रामुख्याने अवजड वाहनांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी (दि.२) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित १४ वाहतूक विभाग प्रमुखांची बैठकीत खरडपट्टी काढली.
पुण्यातील आंबेगाव, बिबवेवाडी, नर्हे, बाणेर, लक्ष्मीनगर, वानवडी, मुंढवा, हडपसर, मांजरी, लोणी-काळभोर,फुरसुंगी, लोणीकंद, वाघोली खराडी या १४ वाहतूक विभागात मोठे अपघात घडले आहेत. मागील आठ महिन्यांत परिसरात ३४ ब्लॅकस्पॉटवर घडलेल्या अपघातात तब्बल १८४ जणांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, वाहतूक विभागाकडून वारंवार जनजागृती करूनही अवजड वाहन चालकांसह बेशिस्तांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. प्रत्यक्षात मात्र, वाहन चालकांकडून नियमांना तिलांजली दिली जात असल्यामुळे सर्वसामान्यांना जीवाला मुकावे लागत आहे.
बेशिस्त वाहन चालक, अरूंद रस्ते, वाहन चालकांचा बेदरकारपणा अपघातांना निमंत्रण देत आहे. शहरात ३४ अपघातग्रस्त ठिकाणे (ब्लॅकस्पॉट) असून, त्याठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दीर्घकालीन कृती आरखडा तयार करण्याचे निश्चित केले होते. मात्र, सद्य स्थितीत शहरांतर्गत रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः उपनगरातील अवजड वाहने, अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. पुणे शहरालगत लोणीकंद, लोणी काळाभोर भागासह सोलापूर, नगर रस्त्यावर अवजड वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत खासगी कंपन्या आहेत. तर नगर, मराठवाड्याकडे जाणारी वाहने या भागातून जातात. या भागातील वाहनांची वर्दळ विचारात घेतल्यास अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
बेशिस्त चालकांविरुद्ध कठोर कारवाई करा- पोलीस आयुक्त
वाघोली, लोणीकंद, केसनंद परिसरात अनेक गृहप्रकल्प उभे राहत आहेत. तसेच संबंधित भागातील खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी या भागात वास्तव्यास प्राधान्य देतात. त्यामुळे दररोजची मोठी वर्दळ असून, बेशिस्त अवजड वाहने, सिमेंट मिक्सर, पाण्याचे टँकर, कचरा वेचक गाड्यांसह इतर वाहने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अवघ्या ८ महिन्यांत १८४ जणांना हकनाक आपला जीव गमवावा लागला. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित वाहतूक विभाग प्रमुखांना जाब विचारला. बेशिस्तांविरुद्ध कारवाई का होत नाही, संबंधित अवजड वाहन चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करा, कारवाईचा कठोर बडगा उगारण्याचे आदेशही अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
वाहतूक सुरळित ठेवण्यासह अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. मात्र, काही बेशिस्त दुचाकीस्वार, मोटार चालक, अवजड वाहन चालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडत आहे. संबंधित विरुद्ध वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला आहे.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर





















