बांधकाम विभागात नोकरी देण्याचे आमिष, ३ लाखांची केली फसवणूक, कोल्हापूर, सांगलीच्या ठगांविरुद्ध गुन्हा दाखल
Marathinews24.com
पुणे– सार्वजनिक बांधकाम विभागात गट क पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाला ३ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्याला नियुक्ती झाल्याची बनावट ऑर्डर पाठून, त्याचे मेडीकलही करण्यात आले. परंतू प्रत्यक्षात त्याने सेट्रंल बिल्डींगमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयात चौकशी केली तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी उदय शिंदे (वय ५० ,रा.कोल्हापूर), अरुण देशमुख (वय ४० रा.सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आळंदी देवाची येथील २१ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १ फेब्रुवारी ते ३० मे २०२४ कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण उच्चशिक्षीत असून, स्पर्धा परिक्षेची तयारी करतो. ओळखच्या महिलेच्या माध्यमातून त्याची आरोपी शिंदे आणि देशमुख सोबत ओळख झाली होती. दोघांनी तरुणाला अनुकंपासाखी बांधकाम विभागात नोकरी लावतो, असे सांगितले. त्यासाठी १२ लाख रुपये लागतील, ३ लाख रुपये सुरूवातीला आणि राहिलेले ९ लाख रुपये नियुक्ती झाल्यावर देण्याचे ठरले. तरुणाने दोघांवर विश्वास ठेवत ३ लाख रुपये त्यांच्या हवाली केले. काही दिवसानंतर तरुणाला बांधकाम विभागात नियुक्ती झाल्याची बनावट ऑर्डर देण्यात आली. त्याच्याकडील शैक्षणिक कागदपत्रे घेण्यात आली. एवढेच नाही तर आरोपींनी केम रुग्णालयात त्याचे मेडीकल सुद्धा केले. दोघा आरोपींनी राहिलेले पैसे मागण्यास तरुणाकडे सुरुवात केली होती. परंतू नियुक्ती न झाल्यामुळे तो पैसे देत नव्हता. आरोपींनी तरुणाला त्याच्या इमेल आयडीवर पीडब्लूडी विभागात क्लार्क पदावर नियुक्ती झाल्याचा मेल पाठविला. तरुण हा आरोपी देशमुखसोबत मुंबईला गेला. तेथील सार्वजनिक बांधकाम विभागच्या इमारतीजवळ मुन्ना नावाच्या व्यक्तीने तरुणाला गट क पदाच्या नियुक्ती आणि रुजू अहवालाचे पत्र दिले. आरोपींनी तरुणाला तुझे काम झाले असून, पुण्यात रुजू व्हा असे सांगितले. ८ दिवसानंतर तरुण जेव्हा प्रत्यक्ष पुण्यातील बांधकाम विभागात पोहचला, तेव्हा त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तरुणाने आरोपींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याचा फोन घेण्याचे बंद केले.
३९ कर्जदारांची फसवणूक करून आरोपी झाला पसार – सविस्तर बातमी
बांधकाम विभागात अनुकंपावर नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक केली आहे. फसवणूकीची व्यप्ती मोठी असण्याचा अंदाज आहे. आत्तापर्यंत आमच्याकडे एकच तक्रार आली असून, अशाप्रकारे कोणाची फसवणूक झालेली असल्यास संबंधितांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात संपर्क करावा.- गणेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक, बंडगार्डन पोलिस ठाणे