ऑपरेशन मुस्कानची अमंलबजावणी
marathinews24.com
पुणे – शहरातून मागील साडेपाच वर्षात बेपत्ता झालेल्या 3 हजार 221 जणांचा अद्याप पुणे पोलिसांना शोध लागलेला नसल्याचे चित्र समोर आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये महिला- पुरूष व मुले-मुलीचा समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान ही मोहिम हाती घेतली आहे. अशी माहिती गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली. दरम्यान, बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींची आकडेवारी मोठी आहे. सन 2020 ते मे 2026 या कालावधीत तब्बल 26 हजार 616 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील अद्याप 3 हजार 2021 अद्याप सापडलेले नसल्याचे दिसून आले आहे.
पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६ – सविस्तर बातमी
कालावधीत 3 हजार 388 मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील 126 अद्याप सापडलेल्या नाहीत. तर 1 हजार 24 मुले बेपत्ता झाली होती. त्यातील 23 जणांचा पोलिस शोध घेत आहे. महिलांच्या बाबतीत 12 हजार 369 महिला बेपत्ता झाल्या होत्या. हा आकडा बेपत्ता होणाऱ्यांमध्ये सर्वात मोठा असल्याचे दिसते. या महिलांपैकी अजून 1 हजार 76 महिला पोलिसांना सापडलेल्या नाही. तसेच पुरूष देखील 9 हजार 835 बेपत्ता झाल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. त्यातील 1 हजार 996 पुरूषांचा थांग पत्ता अद्यापही लागलेला नाही.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. गुन्हे शाखा त्याचबरोबर स्थानिक पोलिसांच्या सर्व पथकांना याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच मिसिंग सेलचे कामकाज पाहणाऱ्या सर्व पथकांना अलर्ट करण्यात आले आहे. बस स्थानक रेल्वेस्टेशन, शहरातील महत्वाची प्रवासांची ठिकाणे, चौक, पदपथे या ठिकाणी पोलिसांकडून शोध मोहिम हातात घेण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्यांची आकडेवारी पाहिली तर बहुतांश जण पोलिसांना सापडले आहेत. तर साडेपाच वर्षात मिळून न आलेल्या व्यक्तींचा आकडा देखील मोठा आहे.
फक्त बेपत्ता नोंद, परंत आलेल्यांचे रेकार्डच ठेवले जात नाही
पुणे पोलिसांकडून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या स्तरावर बेपत्ता झालेल्यांची नोंद ठेवली जाते. त्यानंतर गुन्हे शाखेकडून ही बेपत्ता झालेल्या मुली-मुले, पुरूष-महिला यांची नोंद ठेवली जाते. यापैकी घरी कोण परतले कोण नाही याची नोंदची काटेकोरपणे ठेवली जात नाही. त्यामुळे शहरातून बेपत्ता झालेल्यांचा आकडा मोठा असल्याचे दिसते. त्यामुळे येथून पुढे तरी पुणे पोलिस शोध लागलेल्यांचे रेकॉर्ड ठेवणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कारणे आहेत बेपत्ता होण्याची
– मुले-मुलींबाबत: घरातून पळून जाणे, ऑनलाइन फसवणूक, अपहरण, मानवी तस्करी ही कारणे तुलनेने जास्त दिसतात.
– महिलांबाबत: कौटुंबिक हिंसा, जबरदस्ती विवाह, मानवी तस्करी, अत्याचार टाळण्यासाठी घर सोडणे
– पुरुषांबाबत: आर्थिक ताण, रोजगारासाठी स्थलांतर, मानसिक ताण, अपघात, स्वेच्छेने संपर्क तोडणे





















