वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
marathinews24.com
पुणे – सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची घटना बावधन परिसरात घडली होती. याप्रकरणात फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५ जणांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी करीत त्यांना जामीन मंजूर केला आहे.
गुन्हेगाराला आश्रय देणे हा जामीनपात्र गुन्हा असताना पोलिस कोठडीची मागणी कोणत्या आधारावर केली. सरकार पक्षाने जागरूकता दाखवायला नको का?, अशा शब्दांत ताशेरे ओढत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आदेश दिला.
प्रीतम पाटील (वय ४७), मोहन भेगडे (वय ५९), बंडू फाटक (वय ५५), अमोल जाधव (वय ३५) व राहुल जाधव (वय ४५) यांना अटक केली होती. त्यांना मंगळवारी ( दि. २७) शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात हजर केले होते. आरोपींनी राजेंद्र आणि सुशील यांना आश्रय दिला. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे का, त्यांनी हगवणे यांना आर्थिक मदत केली आहे का, याचा तपास करायचा आहे, असे तपास अधिकार्यांनी न्यायालयात सांगितले.
आरोपी हे राजकारणी असल्याने साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला. आरोपींकडून अॅड. सुशीलकुमार पिसे, अॅड. कुंडलिक गावडे, अॅड. सचिन जाधव, अॅड. श्रीकांत पन्हाळे यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने पाचही जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर त्यांचा जामीन मंजूर केला.