अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती दणक्यात होणार साजरी, आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती
Marathinews24.com
पुणे – राजमाता पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त हिंदुस्थान शिवमल्हार क्रांतीच्यावतीने पुण्यात एकाचवेळी तब्बल ५० हजार धनगरी ढोल वाजवून ‘ धनगरी नाद ‘ वर्ल्ड रेकॉर्ड केले जाणार आहे. मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात रेसकोर्स मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ढोल वाजविण्याचा विश्वविक्रम केला जाणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. पुण्यातील पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पडळकर यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. प्रामुख्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधीमुळे सुरू असलेले राजकारण, पराभूत झाल्याच्या रागातून विरोधी पक्षांकडून होणारी टीका, यासह विविध विषयांवर त्यांनी माहिती दिली.
शिधावाटक दुकानदाराच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20% दरवाढ – सविस्तर बातमी
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी येथे झाला होता. महिला राज्यकर्ता म्हणून त्यांचे कार्य जगात उल्लेखनीय आहे. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने धनगर समाजाच्या असलेल्या परंपरा, चालीरितीची माहिती जगाला व्हावी. त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. आमच्या चालीरीती अफलातून असून, अनेक परंपरा आमच्या समाजाने जपलेल्या आहे. धनगरी ढोल केवळ वादन नाही, तर तो समाजाचा आत्मा आहे. गावागावात ढोल वादन होत आहे. मोठी सांस्कृतिक चळवळ राबवण्यादृष्टीने धनगरी नाद उपक्रम आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभरातील धनगर बांधव पुण्यात वादनाला येणार
देशात एकत्रित १० हजार पेक्षा अधिक ढोल वादन कधीही झाले नाही. शक्तीचा नाद, भक्तीचा आवाज आणि समाजाची प्रेरणा म्हणजेच ढोल आहे. त्यामुळेच गजीढोलाचा नाद सादरीकरणासाठी राज्यभरातील धनगर बांधवासह गजनृत्य मंडळे सहभागी होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहे. मात्र, आम्ही अजित पवार यांना कार्यक्रमास बोलणार नाही, कारण हा राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून समाजाचा कार्यक्रम आहे. धनगरांच्या ज्या घरात, मंदिरात ढोल आहे, तो ढोल वादनासाठी पुण्यात आणला पाहिजे असे आमचे आवाहन आहे. सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे राजकारण
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून राजकारण पेटले आहे. याबाबत सरकारने सर्वांना शांत राहण्याचे आव्हान केले असून, त्यामुळे कोणीही आक्रमक भूमिका घेत नाही. त्यामुळे आम्हाही शांत असून, कोणी काही अल्टिमेटम दिला याबाबत कल्पना नाही. धनगर समाज कुत्र्याला खंडोबा मानतो, कारण तो मालकाशी इमानदार राहतो. मध्य प्रदेशचे तुकोजी होळकर यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी त्यावेळी पैसे दिले होते. आता नव्याने वाद काढणे उचित नाही. सरकारने वाघ्या कुत्रा पुतळ्याला संरक्षण द्यावे. संभाजी ब्रिगेडने हा विषय पुढे आणला असून, त्यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत आपले काही म्हणणे नाही अशी भूमिका घेतली आहे. हे त्या संघटनेचे दुटप्पी धोरण असल्याची कठोर टीका आमदार गोपीचंद पडळक यांनी केली आहे. तसेच ब्राम्हण समाजाच्या विरोधात टोकाची टीकेचा प्रयत्न संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करत आहे. एखाद्या ब्राम्हणसाठी सर्व ब्राम्हणांना बदनाम करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
खासदार शरद पवारांवर चौफेर टीका
राज्यात सत्ता मिळाली नसल्याच्या नैराश्यातून खासदार शरद पवार विविध संघटनाच्या माध्यमाातून अनेकांची माथी भडकावितातत. सध्या पवारांकडे फावला वेळ असून, त्यांनी स्वतःला वाटेल असा इतिहास लिहावा. असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात जात पाहून इतिहास काढला जातो आहे. नवीन इतिहासकार मागील १० वर्षात जन्मास आले असून, ते इतिहासकार २५० रुपयांचे जॅकेट घालून फिरत असल्याचा समाचार त्यांनी घेतला.