संतप्त नागरिकांचा दुसर्या दिवशीही पोलीस ठाण्यात ठिय्या
marathinews24.com
पुणे – अवघ्या चार दिवसांवर येउन ठेपलेल्या स्वतःच्या लग्नानिमित्ताने खरेदीसाठी गेलेल्या २१ वर्षीय तरूणीचे दोघा भावडांनी अपहरण केले आहे. आरोपी दोघा भावडांनी तिच्यासह आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून मोटारीतून तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१७) भरदिवसा भिगवणमध्ये घडली आहे. घटनेच्या निषेधार्थ सलग दुसर्या दिवशीही संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. त्यासोबतच आजूबाजूच्या गावकर्यांनी आरोपींविरूद्ध सह्यांची मोहिम राबवली आहे. त्यांना अटक करून कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अपहरणकर्त्यांच्या शोधार्थ पोलिसांची ६ पथके रवाना केली आहेत.
पुणे पोलिसांनी उधळला खुनाचा डाव – सविस्तर बातमी
झहीर हरून शेख आणि आयान हरून शेख (दोघे रा. शेख वस्ती स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे) या सख्या भावांविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अपहरणाच्या घटनेला ३० तासांहून अधिक काळ लोटलेला असतानाही, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे नागरिकांसह कुटूंबियांना संताप व्यक्त केला आहे. सलग दुसर्या दिवशीही संतप्त नागरिकांनी भिगवण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. आरोपींना तत्काळ अटक करा, आमची मुलगी आम्हाला मिळवून द्या अशी घोषणाबाजी परिसर दणाणून सोडला होता. दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, आरोपींसह त्यांच्या नातेवाईकांनाही गुन्ह्यात सहभागी करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर बातमी वेगाने पसरली अन लोक जमले
जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भिगवण मोठी बाजारपेठ असून, नागरिकांची मोठी वर्दळ असते. मंगळवारीही परिसर गजबजलेला असतानाही आरोपी शेख भावडांनी फिल्मी स्टाईल तिचे अपहरण केले. त्यामुळे घटनेची माहिती वेगाने सोशल मीडियावर पसरली होती. त्यानंतर लगेचच मदनवाडी, स्वामी-चिंचोली, भिगवण, खडकी, रावणगाव, मलठण, कुंभारगाव परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाणे परिसरात धाव घेतली होती. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्ग अडवून टायर जाळले होते. घटनेच्या गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी जमावाला शांत केले.
पोलिसांकडून १६५ किलोमीटर मॅपिंग
पीडितेच्या शोधासाठी पोलिसांनी १६५ किलोमीटरचा रूट मॅप केला आहे. कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, आरोपी आणि पीडितामध्ये काही संभाषण झाले आहे का, यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यासोबतच त्यांचे व्हॉटसअॅप चॅटिंग, फोन कॉल्स डिटेल्स तपासले जात आहेत.
स्वामी-चिंचोलीच्या माजी सरपंचाविरूद्ध कारवाई करा
दोन्ही आरोपी स्वामी-चिंचोली ता. दौंड गावचे माजी सरपंच अझरुद्दीन शेख याचे नातलग आहेत. त्यानेच आरोपींना पाठीशी घातले असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. यापुर्वी अझरूद्दीनविरूद्ध अनेक गुन्हे दौंड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. तलाठ्याला मारहाण करणे, दोन सरपंचावर खुनी हल्ला करणे, खोट्या अॅट्रोसिटी दाखल करणे, गायरानातील मुरूम चोरणे असे अनेक घटनानंतरही त्याला पाठीशी घातले जात आहे, असा आरोपी स्वामी-चिंचोली ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावकर्यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांची भेट घेउन निवेदन दिले आहे.
भिगवणकरांना बंद यशस्वी
तरूणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ गावकर्यांनी भिगवण बाजारपेठ बंद ठेवली होती. व्यावसायिकांसह हॉटेल चालकांनी स्वयंस्फुतीने दुकाने बंद ठेउन घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. आरोपींनी २१ वर्षीय तरूणीचे अपहरण केले असून, त्यांच्या शोधार्थ ६ पथके रवाना केली आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, इतर ठिकाणीही शोधमोहिम सुरू आहे. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, दोन्ही समाजाच्या प्रमुख पदाधिकार्यांसोबत बैठक पार पडली आहे. पोलीस आपले काम करीत असून, सर्वांना शांतता राखावी.
संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण






















