पुणे पोलिसांनी उधळला खुनाचा डाव

पुणे पोलिसांनी उधळला खुनाचा डाव

पिस्तुलासह सुपारी घेणाऱ्याला बेड्या

marathinews24.com

पुणे – खुनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ८ जणांनी एकत्र येत खुनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेळीच कारवाई करत खुनाचा डाव उधळून लावला आहे. याप्रकरणी पिस्तुलासह दोन काडतुसे बाळगणाऱ्या सराईताला बेड्या ठोकल्या आहेत. तर खुनाची सुपारी देणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय २६, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर सिंधू धोत्रे उर्फ आक्का, अमन झरेकर याची आई सिन्नू झरेकर, गणेश रेणुसे याची आई पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर (सर्व रा. महालक्ष्मी बिल्डिंग सिंहगड रस्ता, दत्तवाडी) सुमित माने (रा. हडपसर), निशांत राऊत (रा. अपर बिबवेवाडी) आणि बापू कांबळे (रा. अपर बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार अमर आनंदराव पवार यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. १७ फेब्रुवारीला दांडेकर पूल परिसरात कारवाई करण्यात आली.

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक एकचे अंमलदार १७ फेब्रुवारीला परिसरात पेट्रोलिंग होते. पोलिस हवालदार सचिन माळवे यांना गांजवे चौकात आल्यानंतर माहिती मिळाली की, दांडेकर पूल परिसरात गणेश रेणुसे, सुमित माने, निशांत राऊत, अमन झरेकर तसेच इतरांनी टोळी तयार करून एकाचा खूनाचा कट रचला आहे. त्याचाच भाग म्हणून एक पिस्तुल आणून ते बाळ्या नावाच्या सराईत गुन्हेगाराला दिल्याची माहिती मिळाली होती. बाळ्या नावाची व्यक्ती दांडेकर पूल परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतले.

आरोपीच्या कमरेला उजव्या बाजूला पिस्तुल खोचलेले आढळले. त्याचे नाव चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव असल्याचे सांगितले. सध्या दांडेकर पूल येथे राहत असून मूळचा सोलापूर येथील मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी येथील असल्याचे त्याने स्पष्ट केले. पिस्तुलाबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात आणून त्याची चौकशी केली असता, सिंधू धोत्रे उर्फ आक्का, सिन्नू झरेकर, पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर, सुमित माने, निशांत राऊत व बापू कांबळे यांनी एकत्र येऊन सप्टेंबर २०२५ मध्ये पिस्तुल विकत आणल्याचे समजले. हे पिस्तुल त्यांनी संतोष उर्फ भावड्या साळुंखे याचा खून करण्यासाठी विकत आणले होते. ते बाळ्याला सुमित माने याच्या मार्फत देण्यात आल्याचे उघडकीस आले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्‍त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रणजित फडतरे, अमोल आवाड, सचिन माळवे, रहिम शेख, राजेंद्र लांडगे, दयानंद तेलंगे पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

म्‍हणूनच रचला खुनाचा कट

गणेश रेणुसे व संतोष साळुंखे यांच्यात २०२४ मध्ये भांडणे झाली होती. त्या भांडणात संतोष साळुंखेला कोयत्याने मारहाण केली होती. हल्ल्याचा बदला संतोष साळुंखे घेणार असल्याची माहिती सिंधू धोत्रे उर्फ आक्का यांच्यासह इतरांना मिळाली होती. मात्र, संतोष साळुंखे याच्याकडून काही हालचाली होण्यापूर्वीच त्यांनी साळुंखेच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी ३५ हजार रुपयांत पिस्तुल विकत आणले होते. ते बाळ्याच्या ताब्यात देण्यात आले. सुपारीचे पैसे त्याला काम झाल्यानंतर देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, वेळीच पोलिसांनी कारवाई करून आरोपी टोळीचा डाव हाणून पाडला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×