प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रक्तदान करीत बजावले सामाजिक योगदान
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने यशदा मधील नवनियुक्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. रक्तदान शिबिरात हे जवळपास ७१ जणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्य पार पाडले. विशेषतः यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू यांनी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले व त्यांनी स्वतः व त्यांच्या पत्नी शालिनी सुधांशू यांनीही रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हास्तरावर नव्या कक्षाचे उद्घाटन – सविस्तर बातमी
यशदामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्त झालेल्या वर्ग एकच्या अधिकाऱ्यांचे (सीपीटीपी) एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण सुरू आहे .आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या अधिकाऱ्यांनी यशदाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर वाद्य व पारंपारिक वेशभूषेसह लेझीम पथकांमध्ये भव्य अशी मिरवणूक काढली. त्याचबरोबर देशभक्तीवर गीते गाऊन तसेच ढोल ताशाच्या तालावर नृत्य करून महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा केला. लेझीमच्या तालावर अनेक तरुण अधिकारी नृत्य करत होते. यशदामध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी क्लब आहेत त्यातील सामाजिक सेवा व पर्यावरण क्लबच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ससून रुग्णालय येथील ब्लड बँकेच्यावतीने हा रक्तदानाचा कॅम्प यशदात आयोजित केला होता. ब्लड बँकेचे शरद देसले यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. प्रारंभी यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतः तर रक्तदान केलेच पण त्यांच्या पत्नी शालिनी सुधांशू यांनीही रक्तदान केले. त्याचबरोबर यशदातील वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. साधारणत: ७१ जणांनी रक्तदान केले .प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी रक्तदानाचे महत्त्व जाणून मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याने यशदाचे महासंचालक यांनी या सर्व अधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
हे शिबीर आयोजन करण्यामध्ये यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व स्वाती कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केले. यावेळी यशदाच्या उपमहासंचालक पवनीत कौर, उपमहासंचालक मंगेश जोशी, यशदाचे निबंधक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, यशदाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची उपस्थिती होती.