गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाची कारवाई
marathinews24.com
पुणे – पश्चिम बंगालमधून आलेल्या दोन तरुणींना घरकाम मिळवून देते, असे सांगून एका महिलेने आपल्या घरी ठेवले आणि त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने संतोषनगरमधील एका घरावर छापा टाकून या दोन तरुणींना मुक्त केले. या प्रकरणी मनिषा रघुनाथ साळुंखे (वय ४०, रा. आयप्पा मंदिराजवळ, संतोषनगर, कात्रज) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्या घरातून पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
गुरूवार पेठेत ज्वेलर्समध्ये चोरी; ६८ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक १२ सप्टेंबर रोजी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते. त्यावेळी कात्रजमधील संतोषनगर भागातील एका घरात काही तरुणींना डांबून ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुप्त रणनीती आखत आयप्पा मंदिराजवळ पोहोचून बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला त्या घरात पाठवले. काही वेळातच बनावट ग्राहकाने “कम फास्ट” असा संदेश पाठवत इशारा दिला. यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा घालून कारवाई केली. त्या वेळी घराच्या हॉलमध्ये मनिषा साळुंखे बसलेली होती. घरात दोन तरुणी आढळल्या. चौकशीत त्यांनी सांगितले की, त्या मूळच्या पश्चिम बंगालमधील असून, मनिषा साळुंखे हिने त्यांना पुण्यात घरकाम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन येथे आणले होते. मात्र त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याच घरात राहून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.
तरुणींनी पोलिसांना सांगितले की, प्रत्येक ग्राहकाकडून दीड हजार रुपये घेतले जातात. त्यापैकी अर्धी रक्कम मनिषा साळुंखे स्वतःजवळ ठेवते, तर उरलेली रक्कम त्यांना दिली जाते. पोलिसांनी या माहितीच्या आधारे साळुंखे हिला ताब्यात घेतले. या संदर्भात सहायक फौजदार छाया जाधव यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.























