दोन महिलांविरूद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – नियमबाह्य पध्दतीने रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला खाद्यपदार्थाचा गाडा बंद करण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा महिलेने चावा घेतला आहे. ही घटना २१ सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास वानवडीतील संविधान चौकात असलेल्या काकडे मैदान खाउगल्लीत घडली आहे. याप्रकरणी दोन महिलांविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात केबल चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी
भगवती मोहन सौंद (वय २४ रा. शांतीनगर, वानवडी) आणि सुमित्रा तुलीराम थापा (वय १९ ) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक सारिका शिर्के यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित महिलाविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सारिका शिर्के प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक असून, वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. २१ सप्टेंबरला रात्रपाळीला ड्युटीवर असताना सारिका पथकासह संविधान चौकातील काकडे मैदान खाउगल्लीत गेल्या होत्या. त्यावेळी त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिर्के यांनी संबंधितांना दुकाने बंद करण्यास सांगितले. खाद्यपदार्थ स्टॉलवर कारवाई करीत असताना आरोपी भगवती सौंद आणि सुमित्रा थापा यांनी त्यांना शिवीगाळ केली. सुमित्राने उपनिरीक्षक शिर्के यांच्या डोक्याचे केस ओढून हातावर नख ओरबडले. तर आरोपी भगवतीने हाताचा चावा घेउन त्यांना जखमी केले. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.





















