गर्भवती महिला मूत्यूप्रकरणात पोलिसांकडून ‘ससून’ला अहवाल सादर
Marathinews24.com
पुणे – गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूची घटनेची नोंद ‘मातामृत्यू’ अशी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल अलंकार पोलिसांनी मंगळवार ससून रूग्णालयाकडे सादर केला. या अहवालाची तपासणी केल्यानंतर मातामृत्यू प्रकरणात वैद्यकीय तज्ज्ञांकडून हलगर्जी झाली किंवा नाही, याबाबतचे निरीक्षण नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे.
गर्भवती तनिषा भिसे यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार करण्यात आले नाहीत. त्यानंतर त्यांना पिंपरी-चिंचवडमधील मणिपाल रुग्णालयात दाखल केले. ३१ मार्चला त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मंगेशकर रुग्णालयाने त्वरीत वैद्यकीय सेवा पुरविली नाही, असा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला होता. वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन भिसे यांच्या पतीने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याअनुषंगाने अलंकार पोलिसांनी तपास केला. वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
पुण्यात 850 रुग्णालयांना नोटीस, आपत्कालीन रुग्णांकडून डिपॉझिट न मागण्याचा आदेश – सविस्तर बातमी
भिसे यांना पहिल्यांदा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. सूर्या हाॅस्पिटलमध्ये त्यांची प्रसुती झाली. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चार रुग्णालयातील घटनाक्रम याबाबतचा सविस्तर अहवाल ससून रुग्णालयाला सादर केल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.