डेक्कन जिमखाना पोलिसांनी दुचाकीस्वारासह साथीदारांविरुद्ध केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरात रस्त्यावर होणाऱ्या वादावादीतून मारहाणीच्या घटना वाढलेल्या असताना मध्यरात्री विधी महाविद्यालय रस्त्यावर गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी दुचाकीस्वारासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अमोल काटकर असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. काटकर हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनमध्ये नियुक्तीस आहेत. मध्यरात्री एकच्या सुमारास ते कामावरुन घरी निघाले होते.
प्रभात रोडवर तरुणाची सोनसाखळी हिसकावली – सविस्तर बातमी
विधी महाविद्यालय रस्त्याने दुचाकीस्वार काटकर निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन दोघे जण निघाले होते. दुचाकीला हुल दिल्याने दुचाकीस्वार आरोपींना पोलीस कर्मचारी काटकर यांनी विचारणा केली. त्यावेळी झालेल्या वादातून दुचाकीवरील आरोपींनी काटकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत काटकर जखमी झाले. त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. या घटनेनंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या काटकर यांना तातडीने डेक्कन जिमखाना भागातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पसार झालेला दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदाराचा शाेध घेण्यात येत आहे.
शहरात पोलिसांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दीड वर्षात शहरात वेगवेगळ्या घटनेत ३६ पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्यच्या घटना घडल्या आहेत. हडपसर भागातील कृष्णानगर भागात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पोटात लाथ मारण्याची घटना घडली होती. पुणे स्टेशन परिसरात नाकाबंदी करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालण्यात आली होती.























