साॅफ्टवेअर इंजिनिअरने गेमच्या नादात गमावले ३९ लाख रुपये
Marathinews24.com
पुणे– साॅफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने माेबाईलवर ‘एव्हीएटर’ गेममध्ये तब्बल ३९ लाख रुपये गमावले आहेत. काल्पनिक विमान ज्याप्रकारे उड्डाण करेल त्यानुसार गुंतवणुक केलेले पैस दुप्पट कमविण्याचे नादात ऑनलाईन तब्बल ३९ लाख ७७ हजार रुपये गमावले आहेत. याप्रकरणी प्रतिक गजानन घुगे (वय-३०) या तरुणाने अज्ञात माेबाईल क्रमांक धारक, व्हाॅटसअप धारक, लिंक धारक यांचे विराेधात काेथरुड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रतिक घुगे एका कंपनीत नाेकरी करत असून ताे काेथरुड परिसरात राहायला आहे. त्याचे वेगवेगळया बँकेत खाते असून ते माेबाईल क्रमांकाला लिंक आहेत. नोव्हेंबर २०२४ ते २ फेब्रुवारी २०२५ यादरम्यान त्याला अनाेळखी माेबाईल धारकाने त्यांना फोन केला.
व्हाॅटसअपवर गेमींग प्लॅनची माहिती दिली.
त्याने ९१ अँपल.काॅम ही लिंक डाऊनलाेड केली हाेती. गेमींग प्लॅटफाॅर्मवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर लाॅगीन आयडी व पासवर्ड टाकला हाेता. त्यानंतर एव्हीएटर गेममध्ये सुरुवातीला १० हजार रुपये गुंतवणुक केली. त्यावर काही परतावा न मिळाल्याने पुन्हा १० हजार रुपये गुंतवण्यात आले. त्यानंतर अशाचप्रकारे गुंतवणुक करताना फायदा दिसून येत असल्याने ५ लाख ८६ हजार रुपयांची गुंतवणुक केली त्याचा परतावा एक लाख मिळून आल्याने गेमींग प्लॅटफाॅर्मवर विश्वास बसला. त्यानंतर टप्पाटप्पयाने पैसे गुंतवणुक केल्यावर वेळाेवेळी परतावा मिळल्याने गुंतवणुक केली. परंतु तब्बल १२ लाख १३ हजार रुपये गुंतवल्यावर त्याचा परतावा मिळाला नाही. समाेरुन उत्तर येणे बंद झाले. त्यामुळे जास्त कमाईचे अमिष दाखवून अशाप्रकारे एकूण ३९ लाख ७७ हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत काेथरुड पाेलीस पुढील तपास करत आहे.