चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने मारला डल्ला
marathinews24.com
पुणे – शेअर ट्रेडींगसह आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने तरूणाला तब्बल ३७ लाख ४९ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ५ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२५ कालावधीत फुरसुंगीत घडली आहे. त्यानुसार तक्रारदाराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
रिक्षा चालकाने चाकूच्या धाकाने ज्येष्ठाला लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण फुरसुंगीत राहायला असून, ५ ऑगस्टला सायबर चोरट्याने त्यांना व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड केले होते. शेअर ट्रेडींग आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तक्रारदाराचा विश्वास संपादित करून रक्कम वर्ग करून घेण्यास सुरूवात केली. ३७ लाख ४९ हजार रूपये उकळल्यानंतरही सायबर चोरट्यांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. संशय आल्यानंतर तक्रारदाराने संबंधिताला परतावा मागितल्यानंतर सायबर चोरट्यांनी संपर्क बंद केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करीत आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची बतावणी, २६ लाखांना गंडा
पुणे – वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करीत एकाने तक्रारदाराला तब्बल २६ लाख ३२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ऑगस्ट २०२२ ते मार्च २०२३ कालावधीत खडकी बाजार परिसरात घडली आहे. याप्रकरणी सौरभ सुहास कुलकर्णी (वय ३५ रा. सदभावना नगर, नागपूर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश दळवी (वय ५० रा. पिंपळे गुरव, पिंपरी-चिंचवड) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दळवी आणि आरोपी कुलकर्णी यांची ओळख एका मध्यस्थीमार्फत झाली होती. त्याने दळवी यांची मुलगी वैष्णवीला चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी मॅनेजमेंटला पैसे द्यावे लागतील असे सांगून दळवीकडून रक्कम घेण्यास सुरूवात केली. ऑगस्ट २०२२ ते मार्च २०२३ कालावधीत आरोपी कुलकर्णीने २६ लाख ३२ हजार रूपये उकळले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठी पैसे भरल्याची बनावट पावती दळवींना पाठवून त्यांची आर्थिंक फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करीत आहेत.




















