घोरपडीतील घटना
marathinews24.com
पुणे – चाकूच्या धाकाने रिक्षा चालकाने प्रवासी ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना घोरपडीतील आर्मी पब्लिक स्कूल परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षा चालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षा चालकासह तिघांवरिुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मुंढव्यातील मिलिंदनगर भागात राहायला आहेत. ते रिक्षातून घोरपडी भागातून निघाले होते. चोरट्यांनी रिक्षा आर्मी पब्लिक स्कुलजवळील अंधाऱ्या जागेत नेली. ज्येष्ठाला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील १५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. लूटमार झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला धक्का बसला होता. याबाबत त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी बुधवारी रिक्षा चालकासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत.



















