आमदार बापूसाहेब पठारे यांचा पाठपुरावा यशस्वी सोमनाथनगर ते आपले घर बीआरटी हटविण्यास सुरुवात
Marathinews24.com
पुणे – शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्राधान्य देण्यात येत आहे. मागीली काही दिवसांपासून नगर रस्ता, हडपसर रस्ता, मध्यवर्ती भागातील वाहतूक नियमन सुरळित ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्राधान्याने काम केले आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील वाहतूकीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. त्यांच्यासोबत आता आमदार असलेले सासरे बापूसाहेब पठारे यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगर रस्ता परिसरातील सोमनाथनगर चौक ते आपले घर बीआरटी हटविण्यास सुरूवात झाली आहे.
पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे अनेकांना सातत्याने मनस्ताप सहन करावा लागत होता. संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांमुळेही अपघात झाल्याचे दिसून आले होते. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी नागरिकांनी वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला. त्यानुसार पुणे-नगर रस्ता, हडपसर रस्ता परिसरात पायलट प्रोजेक्ट राबवून आजूबाजूची अतिक्रमणे हटविणे, रस्त्यालगत पथारी व्यावसायिकांविरूद्ध कारवाई करणे, चुकीचे डायव्हर्जन बंद करणे, सिग्नल यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, बेशिस्तांविरुद्ध कारवाईला गती दिली होती. त्यामुळे परिसरात वाहतूकीचा वेग वाढल्याचे दिसून आले आहे.
अपघाताला कारणीभूत ठरणारी बीआरटी मार्गिका सातत्याने अडथळा ठरत होती. त्याबाबत आमदार पठारे यांनी सातत्याने विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, सोमनाथ नगर चौक’ ते आपले घर’ मार्गावर असलेली बीआरटी काढण्यात सुुरुवात झाली आहे. अडीच किलोमीटर असलेला बीआरटी मार्ग महिन्याभरात हटविला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून परिसरातील नागरिकांची सुटका होण्यास मदत होणार आहे. एकीकडे पठारे यांचे जावई असलेले वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडूनही वाहतूक नियमनासाठी सातत्याने नवनवीन उपक्रमांची अमंलबजावणी केली जात आहे. त्यांच्यासोबत आता सासरे बापूसाहेब पठारे यांच्याही पाठपुराव्याला यश आले आहे.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी परिसरातील बीआरटी हटविण्यासाठी सातत्याने प्राधान्य दिले होते. महापालिका आयुक्तांसह अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न मांडला होता. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनाही निवेदन सादर केले होते. त्यानुसार सोमनाथ नगर चौक’ ते आपले घर’ मार्गावरील बीआरटी काढण्यास सुरुवात झाली आहे. – बापूसाहेब पठारे, आमदार