मोक्कानंतर तडीपार केलेल्या गुंडाकडून गावठी कट्टा व काडतुसे जप्त
Marathinews24.com
पुणे – तडीपार गुंडाकडून गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. टोळीचे वर्चस्व टिकून राहण्यासाठी सराईत सातत्याने गुन्हे करीत होता. त्यापार्श्वभूमीवर त्याला तडीपार केल्यानंतरही तो शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चतु:शृंगी पोलिसांना त्याला ताब्यात घेत गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले. अजय चंद्रकांत विटकर (वय २३, रा. हरीहरेश्वर सोसायटीसमोर, जुनी वडारवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस हवालदार बाबासाहेब दांगडे यांनी फिर्याद दिली आहे.
पतीच्या छळाला कंटाळून महिलेची जीवनयात्रा संपवली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय विटकर सराईत गुन्हेगार असून, तो टोळीप्रमुख आहे. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीचे वर्चस्व राहण्यासाठी त्याने परिसरात दहशत माजविली होती. त्यामुळे २०२२ मध्ये त्याच्यासह टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. मोक्कातून २०२४ मध्ये त्याची जामिनावर सुटका झााली. त्यानंतरही त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी त्याला नोव्हेंबर २०२४ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातून तडीपार केले.
चतु:शृंगी पोलिस शनिवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना तडीपार गुंड विटकर पुन्हा वडारवाडीमध्ये आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पठाण गल्लीत विटकरला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याच्यावर आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी पथकाने केली. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.