खडकी दारुगोळा कारखान्यातून २२ काडतुसे चोरी प्रकरण
Marathinews24.com
पुणे – दारुगोळा कारखान्यातून काडतुसे चोरी प्रकरणात आता नवीन माहिती उघडकीस आली असून, कौटूंबिक वादातून साडूला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या साडूने गेम केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता रविंद्र रमेश गोरे (वय ४३ ) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानेच कारखान्यातून काडतूसे चोरी करून साडू गणेश वसंतराव बोरुडे (वय ३९, रा. कल्पतरु सोसायटी, खराडी ररस्ता चंदननगर) यांच्या दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. पोलिसांनी सुरुवातीला बोरूडे यांना अटक केली होती. काडतूसांची चोरी प्रकरणी गुप्तचर यंत्रणेने खडकी पोलिसांच्या मदतीने बोरुडे यांना पकडले होते. त्याच्याकडून २२ काडतुसे जप्त केली होती. गुप्तचर यंत्रणा आणि खडकी पोलिसांनी वेशांतर करून ही कारवाई केली होती. याबाबत दारुगोळा कारखान्यातील कनिष्ठ अभियंता जयेंद्र कस्तुरी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बोरूडे यांना अटक केली. शुक्रवारी (दि.२८ मार्च) सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास ही कारवाई केली होती.
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक – सविस्तर बातमी
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे आणि बोरूडे हे दोघे मावस साडू आहेत. दोघेही खडकी येथील दारुगोळा फॅक्टरीत कामाला आहेत. कौटूंबिक वादातून गोरे हा बोरुडेचा वचपा काढण्यासाठी संधी शोधत होता. त्याला बोरूडेंना अडचणीत आणायचे होते. त्यासाठी गोरेने आपल्या बुटात कारखान्यातून काडतूसांची चोरी केली. ती काडतूसे त्याने बोरुडेंच्या दुचाकीच्या डिकीत ठेवली. त्यानेच चर्चा करून गुप्तचर यंत्रणेपर्यंत बातमी पोहचवली. खडकी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी वेशांतर करुन दारूगोळा कारखान्यातील प्रवेशद्वार क्रमांक १२ जवळ सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बोरूडे प्रवेशव्दारातून बाहेर पडत असताना त्याला पकडले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चोरीचे ठोस पुरावे दिसून आले नाहीत. तांत्रिक विश्लेषनाद्वारे पोलिसांनी तपास केला असता, आरोपी गोरेचे नाव पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवतचा त्याने आपणच हे कृत्य केल्याची कबुली दिली.