भूटानहून घरी आल्यावर उघड झाली चोरी
Marathinews24.com
पुणे – नवी पेठेतील रामबाग कॉलनीत राहणाऱ्या प्रसिध्द व्यापाऱ्याच्या घरातून चोरट्याने तब्बल ८ तोळे सोने चोरून नेले आहे. भूटान आणि मालदीवच्या सहलीहून परतल्यानंतर तक्रारदार यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. पत्नी वाढदिवसानिमित्त लॉकरमधून दागिने काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना दागिने मिळून आले नाहीत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हडपसरमध्ये बनावट कपड्यांची विक्री – सविस्तर बातमी
पोलिसांनी।दिलेल्या माहितीनुसार, सुहास गजानन जोशी (वय ६८) हे त्यांच्या कुटुंबासह रामबाग कॉलनीत राहतात. २१ ते २६ मार्चदरम्यान ते आणि त्यांची पत्नी भूटान व मालदीवला फिरण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांचा मुलगा अजय जोशी हे व्यावसायिक कारणासाठी भूटानमध्ये होता. तक्रारदार यांची सुन नातेवाइकांकडे गेली होती. घरात आजारी असलेले वृद्ध काका डॉ. अरविंद जोशी होते, ज्यांची देखभाल करण्यासाठी ३ वर्षांपासून वेगवेगळ्या महिला केअरटेकर घरी काम करत होत्या.
जोशी कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, घरातील लॉकरमध्ये २५ तोळ्यांपेक्षा अधिक सोने ठेवले होते. जानेवारी २०२५ मध्ये एक दागिना सापडत नव्हता, मात्र त्यावेळी त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र १२ एप्रिलला योगिनी जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि वास्तुशांतीच्या निमित्ताने त्यांनी कपाटाचा लॉकर उघडण्यात आला, तेव्हा काही महत्वाचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी दागिने परत ठेवताना एकूण ८ तोळे सोने गायब असल्याची खात्री झाली.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ३ तोळ्यांच्या बांगड्या, २.५ तोळ्याचं हार, सोन्याचं नथ, कानातल्या बाळ्या, झुमके, कानातील दागिने, मोत्याचे झुमके यांचा समावेश आहे. दागिन्यांची अंदाजित किंमत सुमारे ३ लाख २० हजार रुपये आहे.
चोरट्याने नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केली असून ती व्यक्ती घरातील हालचालींवर बारीक नजर ठेवून असावी. घरात दीर्घकाळापासून काम करणाऱ्या महिला केअरटेकरपैकी कोणीतरी चोरीत सामील असू शकते. विश्रामबाग पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात तपास सुरू केला आहे. घरातील सर्व महिला कर्मचारी यांच्याकडून चौकशी सुरू असून, आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.