शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
Marathinews24.com
पुणे – गडचिरोतील पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करुन पसार झालेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी नरवीर तानाजीवाडी परिसरात पकडले. विशाल ईश्वर वाळके (वय ४०, रा. सुयोगनगर, नवेगाव, गडचिरोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कल्पना केशव उंदिरवाडे (वय ६४, रा़ कल्पना विहार, सुयोगनगर, नवेगाव, जि.गडचिरोली) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन काशीनाथ सोनकुसरे (वय ५७, रा. इंदिरानगर, लांझेडा,जि. गडचिरोली) यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खडकी पोलिसांची तत्परता आली कामी; अवघ्या चार तासात रिक्षा चालकाला शोधले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन सोनकुसरे हे गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांची मोठी बहीण कल्पना उंदिरवाडे या गडचिरोली जिल्हा परिषदेत कक्ष अधिकारी होत्या. त्या २०१८ मध्ये निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले होते. कल्पनाचा मुलगा उत्कल (वय २५) याच्यासोबत त्या राहत होत्या. १३ एप्रिलला कल्पनाचे भाऊ पोलीस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे गडचिरोली पोलीस मुख्यालयात निघाले होते. त्यावेळी कल्पना शयनगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याचे उघडकीस आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोनकुसरे यांचा भाचा उत्कल परीक्षेसाठी गेला होता.
गडचिराेली पोलिसांनी तपास सुरू केला. कल्पना यांच्याकडे भाडेकरु असलेल्या आरोपी विशाल वाळकेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी केल्यानंतर त्याला पुन्हा बोलाविण्यात आले. विशाल चौकशीला उपस्थित न राहता पसार झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा घटनेच्या आदल्या दिवशी तो कल्पना यांच्या घरी आला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी होती. त्याने कल्पना यांच्या मोबाइल क्रमांकावरुन काही व्यवहार केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.आरोपी विशाल पुण्यात पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने त्याला नरवीर तानाजीवाडी परिसरातून ताब्यात घेतले.
गडचिरोली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण हे पुण्यात पोहोचले. पोेलिसांनी वाळके याला ताब्यात दिले. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी प्रमोद मोहिते, चौबे, आहेर, माने, भोसले, हंडगर, सांगवे, गायकवाड यांनी ही कामगिरी केली.