तुळापूर परिसरातील अपघात, नागरिकांमध्ये खळबळ
Marathinews24.com
पुणे – घराजवळ असलेल्या दुकानात खाउ आणण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याला कारचालकाने चिरडल्याची ह्दयदायक घटना १८ एप्रिलला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तुळापूर परिसरातील हॉटेल शिवांकसमोर घडली आहे. याप्रकरणी संबंधित चालकाविरूद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चेतन संतोष दाभाडे ( वय ७, रा. तुळापूर,ता. हवेली) असे ठार झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. त्याचे वडील संतोष दाभाडे ( वय ३८) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार कार चालक बसब विश्वनाथ पॉल (वय ६१, रा. चिखली, पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खुनाच्या गुन्ह्यात तब्बल १४ वर्षे होता फरार आरोपीला ठोकल्या बेड्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष दाभाडे कुटूंबियासह तुळापूरमध्ये राहायला आहेत. त्यांना दोन्ही मुले असून, १८ एप्रिलला दुपारी पावणेबाराच्या सुमारास ते खाउ आणण्यासाठी दुकानात गेली होती. दुकानातून खाउ घेतल्यानंतर दोघेही भावंडे रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी भरधाव वेगातील कार चालक बसब पॉल याने रस्ता ओलांडणार्या चेतनला धडक दिली. त्यामुळे तो काही फुट अंतरावर फेकल्यामुळे गंभीररित्या जखमी झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत चेतनला रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक वंजारी, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी धाव घेतली.
पालकांनो लहान मुलांना एकटे सोडू नका
शालेय विद्यार्थ्यांसह लहान मुलांना आता सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे मामाच्या गावासह नातलगांकडे लहान मुलांना पाठविले जाते. दरम्यान, गावोगावी आता रस्त्यांची सुधारणा, वाहनांची वाढती संख्येमुळे रस्ता ओलांडणेही शक्य होत नाही. परिणामी एकट्या-दुकट्या मुलांना दुकानात पाठविणे, फिरण्यासाठी संधी देणे धोकादायक असल्याचे तुळापूरमधील अपघातावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकांनो आपल्या लहान मुलांना एकट्याला कोठेही जाउ देउ नका, रस्ता ओलांडत असताना त्याच्यासोबत राहा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.