निष्काळजीपणाचा ठपका, पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा; दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरण
marathinews24.com
पुणे– पैशांअभावी गर्भवती महिलेवर वेळेत उपचार न केल्याप्रकरणी डॉ. सुशृत घैसास यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार ससूनच्या अहवालानुसार डॉ. घैसास यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ नुसार १०६ (१)अन्वये अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोनाली उर्फ ईश्वरी सुशांत भिसे (वय ३७, रा.) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडली होती.
गर्भवती मोनाली उर्फ ईश्वरी यांना कुटूंबियाने २१ मार्चला विमानगरमधील इंदिरा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २८ मार्चला ईश्वरीच्या पोटात दुखू लागले. त्यानुसार डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, मुदतपुर्व बाळंतपण करावे लागणार असल्याचा सल्ला कुटूंबियांना दिला. त्यानुसार तिला खराडीतील मदरहुड रूग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, ईश्वरीवर काही महिन्यांपुर्वी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉ. सुशृत घैसास यांनी उपचार केले होते. त्याअनुषंगाने कुटूंबियाने तिला मंगेशकर रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉ. घैसास यांनी ईश्वरीची तपासणी केली असता, तिचा बीपी वाढला होता. मुदतपुर्व प्रसुतीनंतर बाळांना आयसीयूमध्ये ठेवावे लागणार होते. त्यासाठी प्रत्येकी बाळाला १० लाख रूपये असे २० लाख रूपये जमा करण्याचे डॉ. घैसास यांनी सांगितले. आम्ही पैशांचे पाहतो, तुम्ही उपचार सुरू करा असे कुटूंबियांनी डॉक्टरांना सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तुमच्याकडून होत नसल्यास ससूनमध्ये जा, तिकडे उपचार चांगले होतात असे सांगितले.
सरकार तुम्हाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सक्षम; उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
मंगेशकर रूग्णालय प्रशासनाने भिसे कुटूंबियांना जोपर्यंत १० लाख रूपये जमा करणार नाहीत, तोपर्यंत उपचार करणार नाही अशी भूमिका घेतली. महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रूग्णालय प्रशासनाला फोन केला, तरीही रुग्णालयाने त्यांचे ऐकले नाही. तब्बल ५ तास ईश्वरीवर उपचार करण्यासाठी कोणीही आले नाही. त्यानंतर तिला कुटूंबियाने वाकडमधील सूर्या रूग्णालयात दाखल केले. २९ मार्चला सकाळच्या सुमारास ईश्वरीने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तिची तब्येत खालविली. त्यामुळे तिला तातडीने कार्डियाक स्पेशल मणिपाल हॉस्पिटल बाणेरला हलविले. मात्र, ३१ मार्चला रात्री ११ वाजून ५८ मिनीटांनी ईश्वरीचा मृत्यू झाला.
डॉ. सुशृत घैसास यांना गर्भवती ईश्वरी क्रिटीकल असतानाही तिच्यावर उपचार केले नाहीत. पैशांसाठी तिच्यासह कुटूंबियांना वेठीस धरले. उपचाराला उशीर केल्यामुळेच तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ससून रूग्णालय कमिटीने १९ एप्रिलला याबाबत अहवाल दिला आहे. अहवालानुसार ईश्वरीची अतिजोखमीची प्रसुती असतानाही तिला रूग्णालयात भरती करून घेतले नाही. डॉ. घैसास यांच्याकडून असंवेदनशीलतेचा आणि वैद्यकीय हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळेच ईश्वरीचा मृत्यू झाल्याचे ससून अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने प्रियंका अक्षय पाटे यांच्या तक्रारीनुसार डॉ. घैसास यांच्याविरूद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोट- गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांनी ससून प्रशासनाला नव्याने अभिप्राय मागविला होता. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. संबंधित अहवालात डॉक्टरांची मेडिकल निगलिजन्सी असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे
ससून कमिटीच्या दुसर्या अहवालानुसार गुन्हा
तक्रारीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी याबाबत रूग्णालय प्रशासनाकडे अहवाल मागितला होता. त्यानुसार गठित केलेल्या ससून रुग्णालय कमिटीने अहवाल नुकताच पुणे पोलिसांना सादर केला होता. मात्र, कमिटीच्या अहवालानुसार पोलिसांना नेमका दोष कोणाचा होता, याचा बोध झाला नव्हता. त्यामुळे पुणे पोलिसांनी नव्याने चार मुद्यासंदर्भात ससूनकडे पुन्हा अभिप्राय मागितला होता. संबंधित अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा अभ्यास केला. त्याअनुषंगाने कमिटीच्या रिपोर्टनुसार डॉ. सुशृत घैसास यांच्याविरूद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. त्यानंतर डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरण
गभर्वती तनिषा भिसे यांच्यावर उपचार करण्यासाठी कुटूंबियाने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. मात्र उपचारासाठी मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे १० लाख रूपये जमा करण्याचे सांगितले. कुटूंबिय अडीच लाख रूपये जमा करायला तयार झाले. मात्र, रूग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. दरम्यान, तनिषाला प्रसुतीसाठी दाखल करून घेतले नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलविताना गर्भवती तनिषाला प्रचंड त्रास झाल्याने ३१ मार्चला तिचा मृत्यू झाला.