आळंदी आणि देहू संस्थाना पदाधिकारी आणि प्रशासन बैठक संपन्न

आळंदी आणि देहू संस्थाना पदाधिकारी आणि प्रशासन बैठक संपन्न

देहू–आळंदीतून निघणाऱ्या दोन्ही पालख्याच्या पालखी मार्गावरील कामे १५ मेपूर्वी पूर्ण करावीत– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

marathinews24.com

पुणे – आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू व आळंदी पालखी मार्गावरील विविध विकासकामे १५ मे पूर्वी पूर्ण करण्यात यावीत, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिली. देहू व आळंदी संस्थानांकडून प्राप्त मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनामार्फत ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६च्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी घेतली विधानपरिषद सभापती व उपसभापतींची भेट – सविस्तर बातमी 

देहू ते देहू रोड या पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील तीन किलोमीटर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दोन किलोमीटरचे काम संबंधित संस्थामार्फत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. या कामासाठी आवश्यक असलेले देहूरोड कटम मंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. देहू येथील मंदिरापर्यंतचा सुमारे ५०० मीटर रस्ता नगरोत्थान योजनेतून पूर्ण करण्यात येणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे होत असल्याने जागेअभावी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याबाबत संयुक्त पाहणी करून निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. काळभोर नगर ते आकुर्डी येथील मेट्रोचे काम पालखीपूर्वी पूर्ण करावे, तसेच लोणी काळभोर येथील पालखी मुक्कामासाठी जागा वाढवून देण्यात येईल. गवळ्याची उंडवडी, सणसर व निमगाव केतकी येथील पालखी मुक्कामाच्या जागेचा प्रश्न प्रशासनामार्फत सोडविण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

आळंदी संस्थानाकडून आलेल्या मागण्यांबाबतही ठोस भूमिका घेत प्रशासनाला मुदत निश्चित करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील संचेतीपासून एफ.सी. रोडपर्यंत रात्री अखंडित प्रकाश व्यवस्था राहील याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले. बोरावके मळा ते सासवड दरम्यान नव्याने झालेल्या बायपास मार्गावरील अडथळे दूर करण्यात येतील. दिवेघाट येथे आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात येतील. पालखी मार्गावर कोणतीही वाहने बंद पडल्यास वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पालखी सोबत क्रेनची व्यवस्था ठेवण्याची दक्षता प्रशासन व पोलीस विभाग घेतील.

निरा येथील जुना पूल तात्काळ पाडण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. आळंदी येथील प्रलंबित रस्त्यांची कामे, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्धता तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीपर्यंतच्या मोठ्या रस्त्यांच्या कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. आळंदी नगरपालिका क्षेत्रातील रस्ते रुंदीकरणाची कार्यवाही अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

परतीच्या वारीदरम्यान आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या बैठकीत आळंदी व देहू संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, पालखी मार्गावरील संबंधित विभागांचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, गणेश मोरे, विश्वस्त, संत तुकाराम महाराज संस्थान देहू व योगी निरंगनाथ, विश्वस्त, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी, तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×