पीटीपी ॲपमुळे हजारो तक्रारींचे निराकरण
marathinews24.com
पुणे – वाहतूक शाखेने विकसित केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिक ॲप’ या उपक्रमाची स्कॉच पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे. नागरिकांना ट्रॅफिक व्यवस्थापनात सहभागी करून घेण्याच्या या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेण्यात आल्याने विभागासाठी ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. हा पुरस्कार ११ मार्चला जाहीर झाला असून दि. २८ मार्चला नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. ट्रॅफिक समस्यांबाबत नागरिकांकडून थेट माहिती मिळावी आणि त्यावर त्वरित कारवाई करता यावी या उद्देशाने पीटीपी ट्रॅफिक ॲप सुरू करण्यात आले.
पीटीपी ॲपच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील वाहतूक कोंडी, चुकीचे पार्किंग, सिग्नलचे उल्लंघन, रस्त्यावरील अडथळे आदी बाबींची माहिती थेट ट्रॅफिक पोलिसांना पाठविता येते. त्या माहितीच्या आधारे वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त चालकांविरुद्ध कारवाई केली जाते.
उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून हजारो नागरिकांनी ॲपवर नोंदणी केली आहे. ट्रॅफिक समस्यांबाबत आलेल्या अनेक तक्रारींचे निराकरण करण्यातही या प्रणालीमुळे मदत झाली आहे. नागरिकांच्या सहभागातून शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
स्कॉच ग्रुपकडून दिला जाणारा स्कॉच अवॉर्ड हा देशातील विविध शासकीय व प्रशासकीय उपक्रमांमधील नावीन्यपूर्ण कामगिरीची दखल घेणारा मानाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेत सादरीकरण, तांत्रिक मूल्यांकन तसेच पब्लिक वोटिंग अशा टप्प्यांचा समावेश असतो. ट्रॅफिक विभागाच्या या उपक्रमाने नागरिकांचा सहभाग वाढवून वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करण्यास मदत केल्याने या ॲपची पूरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनात या ॲपची निर्मिती केली आहे. प्रक्रीयेत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, पोलिस हवालदार शरद दौंड, ओमीनी ब्रीज टेक्नॉलॉजीचे संचालक राजेंद्र काने, इंजिनिअर नितीन वैद्य व क्रिश इंट्राटेड कंपनीचे व्यवस्थापक अमित गोंजारी यांनी सहकार्य केले. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी विकसीत केलेले हे ॲपचे व प्रकल्पाचे सादरीकरण सॉक्च पुरस्कारासाठी ऑनलाईन पॉवर प्रेझेंटेशन मंडहा समोर केले. पहिली, दुसरी फेरी पार करून तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवल्यानंतर या प्रकल्पाची स्कॉच पुरस्कारासाठी निवड केली.
पुणे शहर पोलिसांनी तयार केलेल्या पीटीपी ॲपला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून आठ महिन्यांच्या कालावधीत १ लाख ४० हजार पेक्षा जास्त नागरिक याचा वापर करत आहे. नागरीकांकडून २ लाखापेक्षा जास्त नियमभंगाची माहिती पोलिसांना सादर केली. त्यावर बारा कोटी पेक्षा जास्त रकमेचा दंड नियमभंग करणाऱ्यांना आकारला आहे.
वाहतुक कोडींस कारणीभूत असणाऱ्या अपघात, वाहनात बिघाड, रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडी, रस्त्यात तेल गळती, रस्त्यावर पाणी साचणे, रस्तवर झाड पडणे, रस्त्यात बेवारस असणारे वाहन अशी माहिती ॲपद्वारे वाहतूक पोलिसांनी कळविण्यात येते. गुरूवारपर्यंत (दि. 12) ५ हजार ४०० घटना रिपोर्ट नागरिकांकडून कळविण्यात आले असून ८० टक्के माहितीवर महापालिकेडून कारवाई केली आहे.
























