पुण्यात परराज्यीय टोळी जेरबंद
marathinews24.com
पुणे – सिग्नलसह गर्दीच्या ठिकाणी थांबलेल्या चारचाकी वाहनाला धडक लागल्याचा बहाणा करून लूटमार करणाऱ्या परप्रांतीय टोळीला गुन्हे शाखेच्या पथक एकने अटक केली आहे. वाहनांच्या काचेवर टकटक करत चालकाचे लक्ष विचलित केल्यानंतर मोबाइल व मौल्यवान वस्तू टोळीकडून चोरी केल्या जात होत्या. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी पुण्यातील विविध भागांत अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. रवी ओमप्रकाश कोहली (वय ३८, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि अफजल कय्युम अब्बासी (वय ३८, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कुख्यात गुंड टिपू पठाणसह टोळीविरुद्ध मोक्का – सविस्तर बातमी
वाहनांच्या काचेवर टकटक करत चोरटे ऐवज चोरून नेत होते. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी युनिट एकच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी पोलिस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे यांना माहिती मिळाली. गुन्ह्यातील संशयित आरोपी समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लॉजमध्ये येणार होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लॉजमध्ये छापा टाकला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. आरोपींनी फरासखाना परिसरातील गुन्ह्यासह पुण्यातील इतर ठिकाणीही चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी सिग्नल किंवा गर्दीच्या रस्त्यावर चारचाकी वाहनाजवळ जाऊन ‘टक-टक’ करून चालकाचे लक्ष वेधायचे. कधी धडक लागल्याचा किंवा पायावरून गाडी गेल्याचा बहाणा करत होते. चालक बाहेर पडताच टोळी गाडीतील मोबाइल, इतर वस्तू चोरून पळ काढत होते.
आरोपींनी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कर्वे रोड, कोथरूड येथील सारस्वत बँकेसमोर उभ्या असलेल्या कारमधून अॅपल कंपनीचा आयफोन १७ प्रो आणि एक पांढऱ्या रंगाचे पाकीट चोरी केल्याची कबुली दिली. या संदर्भात अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचे तपासात उघड झाले. आरोपींनी फरासखाना, अलंकार, विमानतळ ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त शैलेश संखे, पोलिस निरीक्षक अजित जाधव, अनिकेत बाबर, नीलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, ज्योती मुल्का, प्रफुल्ल शेलार यांनी केली.























